"म्हणालो होतो ना! जे मिळेल ते 'मोठं'च मिळेल", प्रसाद ओकची 'चंद्रमुखी'साठी पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:32 IST2025-08-07T15:31:19+5:302025-08-07T15:32:14+5:30
Amruta Khanvilkar: ६० आणि ६१ महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात अनेक कलाकारांना गौरविण्यात आले. या सोहळ्यात अभिनेत्री अमृता खानविलकरला चंद्रमुखी सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

"म्हणालो होतो ना! जे मिळेल ते 'मोठं'च मिळेल", प्रसाद ओकची 'चंद्रमुखी'साठी पोस्ट
६० आणि ६१ महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात अनेक कलाकारांना गौरविण्यात आले. या सोहळ्यात अभिनेत्री अमृता खानविलकर( Amruta Khanvilkar)ला चंद्रमुखी (Chandramukhi Movie) सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक(Prasad Oak)ने केले आहे. हा पुरस्कार अमृताला मिळाल्यानंतर प्रसादने सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे.
प्रसाद ओकने इंस्टाग्राम स्टोरीवर 'चंद्रमुखी' सिनेमाच्या सेटवरील अमृतासोबतचा फोटो शेअर करत तिचे महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्याने लिहिले की, "हेच सांगत होतो मी कधीपासून तुला... की जे मिळेल ते 'मोठं'च मिळेल... जसं की थेट राज्य पुरस्कार सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्री चंद्रमुखी.!!! तुझ्यासाठी मी खूप खूश आहे."
अमृता खानविलकर सध्या भारतात नसली तरी अगदी सातासमुद्रापार राहून तिने याबद्दल तिचा उत्साह आणि आनंद शेअर केला. ती म्हणाली की, "आज माझ्यासाठी माझ्या महाराष्ट्र राज्याने मला हा मान देणं खरंखरोच खूप जास्त खास आहे. चंद्रमुखीसाठी आम्ही सगळ्यांनी एक टीम म्हणून काम केलं अगदी दिग्दर्शकापासून ते स्पॉटबॉयपर्यंत सर्वांनी घेतलेली मेहनत ही कायम सार्थकी लागली आहे. ठिकठिकाणी या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम हे आजही दिसून येतंय. मला जर एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळालेली आहे चंद्रमुखीसाठी तर ती मला माझ्या महाराष्ट्र राज्याने दिली आहे."
''हा क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही''
ती पुढे म्हणाली की, "महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित होणं हा क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. अर्थातच हा माझा पहिलावहिला राज्य पुरस्कार आहे. यातून मी फक्त ऊर्जा आणि नवनवीन दर्जेदार काम करत राहायचं आहे. चांगल्या लोकांबरोबर काम करायचं आणि आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची आहे. या निमित्ताने संपूर्ण ज्युरी टीमचे महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार टीमचे खूप खूप आभार त्यांनी हा क्षण माझ्या आयुष्यात आणला माझं कामाचं कौतुक करून हा खास पुरस्कार मला दिला याबद्दल मी कायम ऋणी राहील खूप खूप धन्यवाद."