‘भूमिकेमुळे मी माणसे जोडली’ - चिन्मय मांडलेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 19:48 IST2017-07-01T14:08:15+5:302017-07-01T19:48:49+5:30

अबोली कुलकर्णी                                   ...

'I joined people because of the role' - Chinmay Mandlekar | ‘भूमिकेमुळे मी माणसे जोडली’ - चिन्मय मांडलेकर

‘भूमिकेमुळे मी माणसे जोडली’ - चिन्मय मांडलेकर

ong>अबोली कुलकर्णी
                                             
निर्माता, दिग्दर्शक, लेखक, स्क्रिप्ट रायटर, अभिनेता, कवी अशा अनेक भूमिकांमध्ये लीलया वावरणारा कलाकार म्हणजे चिन्मय मांडलेकर. भाषेवर प्रभुत्व, देहबोली, उत्कृष्ट संवाद ही त्याच्या अभिनयाची वैशिष्टये. ‘मोरया’,‘तेरे बिन लादेन’,‘सनई चौघडे’, ‘पांगिरा’ यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. बऱ्याच  मालिकांमधून त्याने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. सध्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘तू माझा सांगाती’ मालिकेतील त्याची तुकाराम महाराजांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते आहे. तो आता आषाढी एकादशीनिमित्त वारीतून विठूरायाच्या दर्शनाला जाणार आहे. यानिमित्त त्याच्याशी केलेली ही हितगुज...

प्रश्न: आत्तापर्यंत मालिकेचा १००० भागांचा प्रवास कसा होता?
- मालिकेसोबत आत्तापर्यंत केलेला प्रवास छान होता. शूटींग सुरू होऊन तीन वर्षे झाली. एवढा प्रवास होईल असं वाटलं नव्हतं. फार तर सात, आठ महिने मालिका चालेल असं वाटलं होतं. अनेकांना मालिका आवडतेय हे यावरूनच कळतेय. तशा प्रतिक्रियाही मला मिळत आहेत, याचा आनंद वाटतोय. 

प्रश्न: तू लवकरच वारीला जाणार आहेस त्याबद्दल काय सांगशील?
- खरंतर मी दरवर्षी वारीला जात असतो. मागच्या वर्षी देखील मी पालखी सोहळ्यासाठी गेलो होतो. ‘तू माझा सांगाती’च्या निमित्ताने मला वारीला जायला मिळतेय, याचा आनंद होतोय. मला वारीला जाणं, तिथलं वातावरण, वारकऱ्यांसोबत राहणं खुप आवडतं. आता तर कामाच्या निमित्ताने मला जायला मिळतेय, तर खुप छान वाटतेय.

प्रश्न: तू माझा सांगातीचे दुसरे पर्व लवकरच येणार आहे. ज्यामध्ये तुकारामांच्या मुखी विठ्ठल रखुमाईची संसारगाथा बघायला मिळणार आहे काय सांगशील ?
- तुकाराम आणि आवली यांच्यावर प्रेक्षकांनी आत्तापर्यंत भरभरून प्रेम केलं. तसंच आता या दोघांच्या दृष्टीतून प्रेक्षकांना विठ्ठल-रखुमाई यांची संसारगाथा पहावयास मिळणार आहे. ती देखील प्रेक्षकांना आवडणार, यात काही शंकाच नाही. 

प्रश्न: तुकाराम या भूमिकेत असताना तुझ्या स्मरणात राहिलेला क्षण किंवा अनुभव कुठला ?
- तुकाराम या भूमिकेने मला दिलेले अनुभव अनेक आहेत. अनेक गोष्टी, किस्से, घटना घडल्या. तुकारामांवर श्रद्धा असणारे लोक हे प्रत्येक वर्गातले आहेत. कधीकधी लोक येऊन माझ्या पाया देखील पडतात. पण, साहजिकच या सर्व गोष्टींचा एक कलाकार म्हणून अतिरेकही वाटतो.

प्रश्न: तूकाराम महाराजांचे कोणते विचार तू आत्मसात आणले आहेस?
- तुकाराम महाराजांचे अनेक विचार आहेत जे मला मनापासून पटतात. तुकाराम महाराज हे देवळात नव्हे तर माणसांत देव मानायचे. माझ्यातही तो बदल झाला. मी देखील माणसांतच देव शोधू लागलो आहे. ते रूढी, परंपरा मानत नसत, त्यांचा हा एक विचार मला पटतो.

प्रश्न:  तू तुझ्या बिझी शेड्यूलमधून स्वत:साठी कसा वेळ काढतोस?
- खरंतर दिवसभर शूटिंग करून दमायला होतं, पण माझ्या भूमिकेत मी एवढा रमलो आहे की, माझ्यावर त्या स्ट्रेसचाही काही परिणाम होत नाही. पण, होय मी स्वत:साठी वेळ काढतो. मला आवडतात त्या सर्व गोष्टी करतो. 

प्रश्न: लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून तू आत्तापर्यंत काम पाहिलं आहेस. पण तुला कोणत्या प्रकारांत काम करायला जास्त आवडतं?
- मला तिन्ही प्रकारच्या भूमिकांमध्ये काम करायला आवडतं. तुम्ही जेव्हा अभिनेता असता तेव्हा तुम्हाला दुसरं काहीच टेन्शन नसतं. तुम्ही जेव्हा लेखक असता तेव्हा आरामात टीव्ही पाहतही लिहू शकता आणि जेव्हा तुम्ही दिग्दर्शक असता तेव्हा तुम्हाला मालिकेचे भाग, शो यांच्यावरच लक्ष ठेवावं लागतं. 

प्रश्न: स्क्रिप्ट निवडताना तू कोणत्या गोष्टींची काळजी घेतोस?
- ती गोष्ट नेमकं  काय सांगतेय? आणि दुसरं म्हणजे त्यात माझी भूमिका कशी आहे? कधी कधी काय होतं की, चांगल्या मालिकांचे प्रस्ताव येतात पण त्यात तुमची भूमिका तेवढ्या ताकदीची नसते. म्हणून स्क्रिप्टसोबतच मी भूमिकेकडेही लक्ष देतो.

प्रश्न: आत्तापर्यंतच्या प्रवासात तुझी बेस्ट कॉम्प्लिमेंट कोणती? 
- ‘तू आम्हाला आमच्यातलाच वाटतोस’ ही कॉम्प्लिमेंट मला अनेकांकडून मिळालीय. प्रत्येक वयोगटातील लोक जी मला भेटली त्यांनी माझ्याजवळ हीच प्रतिक्रिया नोंदवली. जसं आपण सलमान खान किंवा शाहरूख खान यांना पाहतो ते कधीच आपल्याला जवळचे वाटत नाहीत, तसं माझ्याबाबतीत होत नाहीये याचा मला आनंद आहे.

प्रश्न: वैयक्तिक आयुष्यात तू कुणाला प्रेरणास्थानी पाहतोस?
- शिवाजी महाराजांना मी प्रेरणास्थानी मानतो. त्यांचे कार्य, त्यांची नीती मला खूप प्रेरणा देते.

प्रश्न: टीव्ही आणि चित्रपट यापैकी कुठल्या ठिकाणी तू स्वत:ला जास्त कम्फर्टेबल मानतोस?
- खरंतर दोन्ही माध्यमं मला मनापासून आवडतात. फक्त टीव्ही मालिका करताना खूप हेक्टिक शेड्यूल असतं. तसं चित्रपटाच्या बाबतीत होत नाही. मालिकेच्या सेटवर कलाकार तुमचे फॅमिली मेंबर होतात. त्यांच्यासोबत तुमचे शेअरींग सुरू होते. चित्रपट करत असताना तुमचे कलाकारांसोबत एका विशिष्ठ कालावधीपर्यंत नाते जोडले जाते. पण, मी दोन्ही ठिकाणी एन्जॉय करतो.

प्रश्न: स्टोरी संपूनही एखादे चॅनल जर  शो केवळ टीआरपीसाठी पुढे नेत असेल तर याविषयी तूला काय वाटते?
- ज्याअर्थी टीआरपी आहे म्हणजे प्रेक्षकांना ती मालिका आवडतेय. कथानक संपूनही जर मालिकेला टीआरपी मिळतो आहे, तर काय हरकत आहे? या सर्व गोष्टी म्युच्युअल असतात. 

प्रश्न: सध्या वेबसीरिजचे वारे वाहत आहे. विविध मराठी कलाकार यात काम करायला तयार होत आहेत. तूला जर संधी मिळाली तर आवडेल का काम करायला?
-  मला वेबसीरिजमध्ये काम करायला आवडेल. एक नवे माध्यम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जे खुपच फ्री आहे, कुठल्याही चॅनेलचा अंकूश त्यावर नाही. तशी संधी मिळाली तर नक्कीच काम करेन.

Web Title: 'I joined people because of the role' - Chinmay Mandlekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.