"हा थरार मला अनुभवायला मिळाला..", दिलीप प्रभावळकरांनी सांगितला 'दशावतार'मधील बाबुलीच्या भूमिकेचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 19:22 IST2025-09-17T19:22:03+5:302025-09-17T19:22:24+5:30
Dashavtar Movie: सध्या 'दशावतार' या सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचंही खूप कौतुक होत आहे. दरम्यान आता एका मुलाखतीत त्यांनी या सिनेमात साकारलेल्या बाबुलीच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे.

"हा थरार मला अनुभवायला मिळाला..", दिलीप प्रभावळकरांनी सांगितला 'दशावतार'मधील बाबुलीच्या भूमिकेचा अनुभव
सध्या 'दशावतार' या सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड सिनेमांच्या गर्दीत 'दशावतार' बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचंही खूप कौतुक होत आहे. दरम्यान आता एका मुलाखतीत त्यांनी या सिनेमात साकारलेल्या बाबुलीच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे.
दिलीप प्रभावळकर 'दशावतार'मधील बाबुलीच्या भूमिका आणि प्रतिसादाबद्दल म्हणाले की, ''ती व्यक्तीरेखा करायला घेताना ती माझ्या कशी डोळ्यासमोर आली आणि कशी उलगडण्याचा प्रयत्न केला. त्याचे पैलू, छटा, बारकावे, लकबी वगैरे वगैरे असे बारकावे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दिग्दर्शक सुबोध खानोलकरला छळूनछळून त्याला प्रश्न विचारले. त्यावेळच्या माझ्या डोक्यातील बाबुलीची प्रतिमा, साकारत असतानाची प्रतिमा आणि केल्यानंतर लोकांची आलेली प्रतिक्रिया. ही सगळी प्रक्रिया खूपच इंटरेस्टिंग होती. मला वाटतं की माझ्या चार अवस्था म्हण किंवा काहीही म्हण. तयारी करताना अस्वस्थता असते. कॅमेऱ्यासमोर ते आव्हान असतं. तिसरी हे मी केलंय ते कसं स्वीकारलं जात आणि माझ्या मनासारखी लोकांनी स्वीकारलं तर आनंद मिळतो आणि ती आवडावी अशी तीव्र इच्छा असते. कारण मी तरी अजूनपर्यंत असं हातचं राखून कुठलीच भूमिका केली नाही. त्यामुळे ती आता तिला कसा प्रतिसाद मिळतो, हे बघण्याची पण उत्सुकता असतेच.''
''असं कोकण मी पाहिलं नव्हतं... ''
ते पुढे म्हणाले की, ''मी चार-पाच सिनेमाचं कोकणात शूट केलंय. पण असं कोकण मी पाहिलं नव्हतं. यांनी कुठनं कुठनं लोकेशन्स रेकी करून काढले अरे रामा. त्यांनी ओळखीच्या स्थानिकांना कामाला लावलं होतं. लोकेशन पाहून थक्क झालो. कोकण इतकं समृद्ध आहे, हे मला नव्याने कळलं. शूट करताना मला खूप आनंद झाला. प्रॉपर घनदाट जंगल होतं. पाण्यात सीन्स होते माझे. म्हणजे पाणी पाणी नाही. खाडी, उथळ नदी, खोल नदी आणि नदीच्या खाली असे सीन्स केले. बाबुलीचा रोल करताना हा थरार मला अनुभवायला मिळाला.''
'''दशावतार'च्या निमित्ताने या कलाप्रकारावर, या परंपरेवर जर अधिक लक्ष वेधलं गेलं तर मला असं वाटतं की दशावतार सिनेमाचं मोठं यश असेल'', असेदेखील दिलीप प्रभावळकर या मुलाखतीत म्हणाले.