"मी नास्तिक झालो ते...", अभिनेता ललित प्रभाकरचं 'ते' वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:31 IST2025-09-15T12:30:37+5:302025-09-15T12:31:38+5:30

ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) चांगलाच चर्चेत आला आहे. नुकताच त्याचा 'आरपार' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

"I became an atheist...", actor Lalit Prabhakar's statement goes viral | "मी नास्तिक झालो ते...", अभिनेता ललित प्रभाकरचं 'ते' वक्तव्य चर्चेत

"मी नास्तिक झालो ते...", अभिनेता ललित प्रभाकरचं 'ते' वक्तव्य चर्चेत

ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. सध्या अभिनेता चांगलाच चर्चेत आला आहे. नुकताच त्याचा आरपार हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्याने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत. दरम्यान एका मुलाखतीत त्याने तो नास्तिक असल्याचे म्हटले.

ललित प्रभाकरने नुकतेच मिर्ची मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्याने तो नास्तिक असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, "मी मुळातच बंडखोर स्वभावाचा आहे. कुणी काही सांगितलं म्हणून मी नास्तिक झालो नाही; तर, शाळेत असताना काही वाचनातूनच माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. याच प्रश्नांनी माझ्या विचारांना दिशा दिली. मी प्रत्येक कामाचा हेतू शोधू लागलो – ‘मी हे का करत आहे? याचा काय फायदा होईल?’ तेव्हापासून प्रश्न विचारणं हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनला." ललित प्रभाकरचा दृष्टिकोन सांगताना तो म्हणाला, "मी कुणाच्या सांगण्यावरून कोणताही निर्णय घेत नाही, पण जर त्यामागील कारण समजावून सांगितलं तर मात्र मी ते काम नक्की करतो. काम करतानाही माझा हाच विचार असतो, की काम करण्यामागे नेमकं काय कारण आहे, हे स्पष्ट असावं."

"मी स्वतःला कधीच एकाच जागी अडकवून घेत नाही"
वैयक्तिक विचारसरणीबद्दल बोलताना तो म्हणाला, "माझ्या मते, स्वातंत्र्य म्हणजे एक मोठी जबाबदारी आहे. अजूनही मला ते पूर्णपणे समजत नाहीये, कारण अनेकदा लोक सोयीनुसार ते टाळतात. आपण आपल्या सोयीच्या चौकटीत राहून काही गोष्टींना 'स्वातंत्र्य' म्हणतो, पण मी मात्र स्वतःला जास्तीत जास्त स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो. मला स्वतःच्याच व्याख्यांनी स्वतःवर मर्यादा घालायच्या नाहीत. मला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत आणि बदलांना स्वीकारायचं आहे, त्यासाठी कोणतीही बंधनं नको आहेत. त्यामुळे मी स्वतःला कधीच एकाच जागी अडकवून घेत नाही."

"मला मर्यादा नकोत, तर..."
ललितने पुढे स्पष्ट केले की, "एका संस्थेसोबत काम करत असतानाही, मीच पहिला होतो ज्याने त्यांना सांगितलं की मला बाहेरही काम करायचं आहे. कारण मी मानतो की, एकाच मर्यादेत अडकून राहणं योग्य नाही. मला मर्यादा नकोत, तर नवीन संधी आणि शक्यतांचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी शक्य तितकं मोकळं राहणं महत्त्वाचं आहे."

Web Title: "I became an atheist...", actor Lalit Prabhakar's statement goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.