हृता दुर्गुळेने सांगितलं कधी होणार आई? मुलाला जन्म देण्याबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:35 IST2025-12-10T12:35:13+5:302025-12-10T12:35:58+5:30
"मला बाळ झालं तर मी हे कधीच नाही करणार..." आई होण्याबाबत हृता असं का म्हणाली?

हृता दुर्गुळेने सांगितलं कधी होणार आई? मुलाला जन्म देण्याबद्दल म्हणाली...
मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या तिच्या 'उत्तर' या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त विविध मुलाखती देत आहे. अशातच 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधताना हृताने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टीचा उलगडा केला. खासकरून तिनं आईच्या निःस्वार्थी प्रेमाबद्दल भरभरून भाष्य केलं.
लग्नाला चार वर्षे होऊनही आपल्या आईची काळजी कशी कायम आहे, हे सांगताना ती म्हणाली, "माझी आई मला नेहमी म्हणते, तुला कळेल मुलगी झाल्यावर. आता मला त्याची जाणीव होतेय. मी कितीही लांब विमान प्रवास करत असले तरी ती जागी असते आणि मला वाटतं की, हे फक्त आईच करू शकते, दुसरं कोणीही नाही".
सतराव्या वर्षापासून काम करत असलेल्या हृताला घरातून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली. ती म्हणाली, "मी १७ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली, पण कधीच असं व्हायचं नाही की दरवाजा उघडल्यानंतर अंधार असायचा. माझी आई नेहमी थांबलेली असायची. माझे बाबा, भाऊ किंवा आता माझा नवरा... ते झोपतात. आता शूटिंगनंतर उशिरा घरी गेल्यानंतर मीच दार उघडून जाते. अशा खूप गोष्टी आहेत, ज्यासाठी मी तिचे आभार मानलेच नाहीत".
याच संभाषणात हृताला बाळाचा विचार कधी करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने अत्यंत रोखठोक पण भावनिक उत्तर दिले. हृता म्हणाली, "आईच्या प्रेमाबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. मला आणि माझ्या आईला पिझ्झा खायला खूप आवडतो. पण, जेव्हा आम्ही पिझ्झा मागवतो, तेव्हा थोडं तरी उरतंच. मग आई नेहमी ते मला किंवा माझ्या भावाला खायला देते. ज्या दिवशी मला हे करावंसं वाटेल ना, त्या दिवशी मी आई होईन. कारण, स्वत:च्या आवडीची गोष्ट मुलाला द्यावी, हा नि:स्वार्थीपणा फक्त आईमध्येच असतो. हे मी कधीच करू शकत नाही.
दरम्यान, 'उत्तर' हा क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित एक आगामी मराठी चित्रपट आहे. ज्यात हृता दुर्गुळेसह रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, आणि निर्मिती सावंत मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट आई आणि मुलाच्या नात्यावर आधारित असून १२ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. मुलाच्या पहिल्या रडण्यापासून ते जीवनातील प्रत्येक वळणापर्यंत आई सावलीसारखी त्याच्यासोबत उभी असते. 'उत्तर' या चित्रपटात हे असेच नाते अतिशय संवेदनशीलपणे, वास्तववादी आणि हृदयस्पर्शी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.