'बिन लग्नाची गोष्ट'साठी प्रिया बापट-उमेश कामतची निवड कशी झाली?, दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:54 IST2025-08-29T16:54:17+5:302025-08-29T16:54:45+5:30
Priya Bapat-Umesh Kamat : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल्सपैकी एक कपल म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. ही जोडी सध्या चर्चेत आहे. ते दोघे येत्या १२ सप्टेंबरला ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

'बिन लग्नाची गोष्ट'साठी प्रिया बापट-उमेश कामतची निवड कशी झाली?, दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले...
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल्सपैकी एक कपल म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat). ही जोडी सध्या चर्चेत आहे. ते दोघे येत्या १२ सप्टेंबरला 'बिन लग्नाची गोष्ट' (Bin Lagnachi Gosht Movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रिया–उमेशची जोडी आधीपासूनच प्रेक्षकांची आवडती आहे. त्यांच्या सहजसुंदर केमिस्ट्रीमुळे दोघंही पडद्यावर रिअल वाटतात आणि हाच नैसर्गिकपणा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या नजरेत भरला.
आदित्य इंगळे यांनी प्रिया आणि उमेश यांच्या निवडीबद्दल सांगितले. ते म्हणाले की, ''मी उमेश-प्रियाकडे एकदा जेवायला गेलो असताना, प्रियाची शिस्त, उमेशचा सहजपणा, गंमतीशीर स्वभाव बघून मला त्या दोघांपेक्षा त्यांच्यात माझी पात्रच दिसायला लागली. आशय आणि ऋतिका सारखेच ते वागत होते. ते इतके या पात्रांमध्ये फिट होत होते की त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही, असं मला वाटलं म्हणून मी त्यांना या चित्रपटासाठी विचारलं. त्यांना कथा ऐकवली. प्रिया तर गंमतीनं म्हणाली सुद्धा 'तू आधी मला बघितलं आणि मग हे पात्र लिहिलं ना?' खरं तर या व्यक्तिरेखा आधीच लिहिल्या होत्या आणि हे दोघं त्यात परफेक्ट बसले. आशय -ऋतिका आणि उमेश-प्रियाच्या वागण्यात इतकं साम्य होतं की, दुसरं कोणी मला दिसलंच नाही.''
गिरीश ओक आणि निवेदिता सराफ ही लोकप्रिय जोडीदेखील चित्रपटात झळकणार आहे. या दोन जोड्यांच्या रंगतदार अभिनयामुळे ‘बिन लग्नाची गोष्ट’ प्रेक्षकांसाठी खास अनुभव ठरणार आहे. गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित ‘बिन लग्नाची गोष्ट’ १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे.