आता मराठी शाळा भरणार! 'क्रांतीज्याोती विद्यालय' हेमंत ढोमेच्या नव्या सिनेमाची घोषणा, म्हणाला- "मी स्वत: मराठी शाळेत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 13:56 IST2025-05-01T13:56:00+5:302025-05-01T13:56:31+5:30
'झिम्मा २' आणि 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटांनंतर हेमंत ढोमे नवा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठी शाळांवर हेमंत ढोमेचा नवा सिनेमा आधारित असणार आहे. या सिनेमाचं नाव 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' असं असणार आहे.

आता मराठी शाळा भरणार! 'क्रांतीज्याोती विद्यालय' हेमंत ढोमेच्या नव्या सिनेमाची घोषणा, म्हणाला- "मी स्वत: मराठी शाळेत..."
आज महाराष्ट्र दिनी आणि मराठी राजभाषा दिनी हेमंत ढोमेने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. 'झिम्मा २' आणि 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटांनंतर हेमंत ढोमे नवा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठी शाळांवर हेमंत ढोमेचा नवा सिनेमा आधारित असणार आहे. या सिनेमाचं नाव 'क्रांतिज्योती विद्यालय -मराठी माध्यम' असं असणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हेमंत ढोमेने सिनेमाची घोषणा केली आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर त्याने शेअर केलं आहे.
हेमंत ढोमेने सिनेमाची घोषणा करत त्याच्या शालेय शिक्षणाबद्दल उलगडा केला आहे. माझं शिक्षणही मराठी शाळेतच झाल्याचं त्याने म्हटलं आहे. याशिवाय कोणत्या कोणत्या मराठी शाळेत शिक्षण झालं याची माहिती त्याने पोस्टमधून दिली आहे.
मराठी शाळा जगली तर मराठी भाषा जगेल!
मी स्वतः रायगड जिल्ह्यात “जिल्हा परिषद” शाळेत शिकलेला विद्यार्थी…. मराठी माध्यमात शिक्षण पूर्ण करून पुढे UK ला KENT UNIVERSITY मधे जाऊन MASTERS IN WILDLIFE CONSERVATION & INTERNATION TRADE या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं…
मनापासून सांगतो… जागतिक पातळीवर आपण मराठी माध्यमात शिक्षण घेतलं याचा खरंतर तोटा कमी आणि फायदाच जास्त झाला! माझ्या UK मधल्या मित्रांना माझ्या शिक्षकांना माझं मराठी शाळेतलं शिक्षण, माझी संस्कृती, माझी जडणघडण सारंकाही अभिमानाने सांगता आलं आणि त्याचं त्यांनी प्रचंड कौतुक देखिल केलं!
मराठी माध्यमात म्हणजे आपल्या मातृभाषेत शिकताना आपलं साहित्य, आपल्या परंपरा आणि संस्कृती याची भक्कम ओळख झाली आणि स्वतःबद्दल स्वतःच्या संस्कृती बद्दल अभिमान बळकट झाला! मी आज जो काही घडलो आहे तो माझ्या मराठी शाळांमुळेच…
आजकाल मराठी माध्यमातल्या शाळांमधला पट कमी होऊन खूप मराठी शाळा बंद होत आहेत जी मराठी भाषेसाठी अत्यंत काळजीची बाब आहे… या कठीण काळात माझ्या या नव्या चित्रपटातून आपल्या मुळ भाषेतलं शिक्षण हे कमीपणाचं नसून समृद्ध करणारं असतं हे सांगायचा माझा प्रयत्न आहे…
“मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकेल आणि पर्यायाने आपली मराठी संस्कृती!”
या काळात प्रचंड मोठ्या जनजागृती ची गरज आहे, मी माझ्या पासून सुरूवात करतोय…
पुन्हा एकदा माझ्या या नव्या चित्रपटातून मी जे जगलो, मी जे शिकलो आणि त्यातून कसा समृद्ध झालो हा प्रवास सांगायचा आहे!माझ्या आजवरच्या सर्व मराठी शाळांना, माझ्या शिक्षकांना, शाळेच्या शिपायांना, माझ्या वर्गमित्रांना… माझा सलाम!
आपल्या मातीत रुजावं आणि आभाळाला भिडावं!
चलचित्र मंडळीचा पाचवा सिनेमा
“क्रांतीज्योति विद्यालय - मराठी मिडीयम”
लवकरच तुमच्या भेटीला!मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आता मराठी शाळा पुन्हा भरणार!
हेमंत ढोमेचा हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमेनेच केलं आहे. तर क्षिती जोग आणि आनंद एल राय हे सिनेमाचे निर्माते आहेत. सिनेमाची स्टारकास्ट अद्याप गुलदस्त्यात आहे.