'दुर्लक्ष करा' प्रिया बेर्डेंनी केलेल्या टीकेनंतर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली, 'काय वाईट...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 15:04 IST2023-04-12T15:03:23+5:302023-04-12T15:04:41+5:30

प्रिया बेर्डेंच्या टीकेवर गौतमी पाटीलची पहिलीच प्रतिक्रिया

gautami patil gives reply to priya berde says show me exactly what i am doing wrong | 'दुर्लक्ष करा' प्रिया बेर्डेंनी केलेल्या टीकेनंतर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली, 'काय वाईट...'

'दुर्लक्ष करा' प्रिया बेर्डेंनी केलेल्या टीकेनंतर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली, 'काय वाईट...'

सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा आहे ती म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) हिची. गौतमीच्या नृत्याने तरुणाईला भुरळ घातली आहे. तिच्या कार्यक्रमांना वेड्यासारखी गर्दी होते. गर्दीमुळे अनेकदा कार्यक्रम बंदही पाडला जातो. पोलिसांना मध्यस्थी करावी लागते. सुरुवातीला अश्लीलतेमुळे तिच्या डान्सवर थेट अजित पवारांनीच नाराजी दाखवली होती. यानंतर तिने माफी मागितली आणि पुन्हा असं नृत्य करणार नाही असं आश्वासनही दिलं. गौतमी पाटीलने आता नृत्यात किती जरी बदल केला असला तरी तिच्यावर होणारी टीका काही थांबत नाही. नुकतेच अभिनेत्री प्रिया बेर्डेने (Priya Berde) गौतमीच्या डान्सवर टीका केली. त्यावर आता गौतमीने प्रत्युत्तर दिले आहे.

गौतमीचा डान्स लावणी नाहीच तर अश्लीलताच जास्त असते असं अनेकांचं मत आहे. कित्येक लावणी कलाकारांनी तिच्यावर टीका केली आहे. तरी तरुण वर्ग मात्र तिच्या मागे वेडा आहे. गावागावात तिचे कार्यक्रम हाऊसफुल होत आहेत. यावर नुकतंच प्रिया बेर्डे यांनी मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या,'गौतमी पाटीलसारख्या कलाकारांना आपणच मोठे करत आहोत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. रसिकांनी बघणं सोडलं पाहिजे तरच हे सगळं थांबेल.'

प्रिया बेर्डे यांच्या या टीकेवर गौतमी पाटीलने एका वाक्यात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तिने प्रतिक्रियेतून प्रिया बेर्डेंनाच प्रतिप्रश्न केला आहे. ती म्हणाली, 'मी काय वाईट करतेय हे त्यांनी दाखवावं.'

गौतमीची प्रसिद्धी आणि तिच्यावर होणारी टीका दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गौतमीची क्रेझ मात्र काही कमी होत नाही. गौतमीने आता अभिनयातही पदार्पण केले आहे. तिचा 'घुंगरु' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Web Title: gautami patil gives reply to priya berde says show me exactly what i am doing wrong