गश्मीर महाजनीला 'बिग बॉस'मध्ये पाहण्याची इच्छा होणार पूर्ण, स्वतःच दिले संकेत; म्हणाला "मला ते करायचे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:37 IST2025-08-20T12:37:12+5:302025-08-20T12:37:36+5:30
गश्मीर महाजनीनं 'बिग बॉस'बद्दल मोठा खुलासा केला आहे.

गश्मीर महाजनीला 'बिग बॉस'मध्ये पाहण्याची इच्छा होणार पूर्ण, स्वतःच दिले संकेत; म्हणाला "मला ते करायचे..."
मराठी सिनेसृष्टीचा 'हँडसम हंक' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गश्मीर महाजनी आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. गश्मीरने आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलिकडेच त्याने रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' या लोकप्रिय शोच्या १४ व्या सीझनमध्ये आपल्यातील धाडसी बाजू दाखवून दिली होती. टॉप ५ मध्ये तो पोहचला होता. पण, थोडक्यात त्याचं विजेतेपद हुकलं होतं. आता गश्मीरनं सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या एका इच्छेमुळे त्याच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना त्याने 'बिग बॉस'मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
गश्मीर महाजनी नेहमीच सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. नुकत्याच त्याने इन्स्टाग्रामवर आयोजित केलेल्या #ASKGASH या प्रश्नोत्तर सत्राची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या सेशनमध्ये चाहत्यांनी त्याला विविध प्रश्नांची विचारणा केली, ज्यात त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश होता. मात्र, एका विशिष्ट प्रश्नाने सर्वांचेच लक्ष वेधले आणि गश्मीरने दिलेल्या उत्तराने चाहत्यांना आनंद झालाय. एका चाहत्याने गश्मीरला थेट विचारले की, 'तुम्ही कधी 'बिग बॉस' या शोमध्ये सहभागी होण्याचा विचार करता का?'. या प्रश्नावर गश्मीरने कोणताही किंतु-परंतु न ठेवता अत्यंत स्पष्टपणे आणि सकारात्मक उत्तर दिलं. तो म्हणाला, "होय, मला ते करायचे आहे".
गश्मीरच्या या उत्तराने सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे. पण, 'बिग बॉस मराठी' आणि 'बिग बॉस हिंदी' यापैकी कोणत्या शोमध्ये जाण्याची त्याची इच्छा आहे, हे त्याने स्पष्ट केलं नाही. गश्मीरने त्याच्या अभिनयाने आणि दमदार व्यक्तिमत्वाने मराठी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे तो 'बिग बॉस'च्या घरात कसा वागेल, हे पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. गश्मीरने जरी 'बिग बॉस'मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी प्रत्यक्षात त्याला या शोमध्ये पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. आगामी 'बिग बॉस'च्या सिझनमध्ये गश्मीर महाजनी स्पर्धक म्हणून दिसणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.