ना अभिनेता, ना सिनेइंडस्ट्रीशी संबंध! राहुल चोप्रा यांनी सांगितला 'गडकरी'साठी निवड होण्यामागचा किस्सा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 01:52 PM2023-10-20T13:52:44+5:302023-10-20T13:53:15+5:30

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत राहुल चोप्रा यांनी बायोपिकसाठी नितीन गडकरींची भूमिका कशी मिळाली, याचा खुलासा केला.

gadkari biopic rahul chopda revealed how he get the role of minister nitin gadkari | ना अभिनेता, ना सिनेइंडस्ट्रीशी संबंध! राहुल चोप्रा यांनी सांगितला 'गडकरी'साठी निवड होण्यामागचा किस्सा, म्हणाले...

ना अभिनेता, ना सिनेइंडस्ट्रीशी संबंध! राहुल चोप्रा यांनी सांगितला 'गडकरी'साठी निवड होण्यामागचा किस्सा, म्हणाले...

भारताचे हायवे मॅन अशी ओळख असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जीवनपट 'गडकरी' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे. नितीन गडकरींच्या या बायोपिकची प्रचंड चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करत त्याची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमात नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून रुपेरी पडद्यावर गडकरींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची झलक दिसली. अभिनेता राहुल चोप्रा नितीन गडकरींच्या भूमिकेत आहेत. गडकरींची भूमिका साकारणाऱ्या राहुल यांनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. 

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत राहुल चोप्रा यांनी बायोपिकसाठी नितीन गडकरींची भूमिका कशी मिळाली, याचा खुलासा केला. ते म्हणाले, "या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग भुसारी यांचा आणि माझा एक कॉमन मित्र आहे. त्या मित्राने मला नितीन गडकरी सरांवर बायोपिक येत आहे. त्यात तुला काम करायला आवडेल का? असं विचारलं होतं. हे ऐकून मी स्तब्ध झालो होतो. कारण, माझा अभिनय क्षेत्राशी संबंध आलेला नाही. माझं थिएटर बँकग्राऊंडही नाही. पण, तो प्रश्नच इतका आवडला की मी लगेच हो म्हणालो." 

"त्यानंतर मग अनुरागशी भेट झाली. त्याने पुढचे आठ-दहा दिवस काही वाक्य माझ्याकडून बोलून घेतली. मी या भूमिकेसाठी योग्य निवड आहे का? मी ही भूमिका करू शकतो का? हे त्याला पाहायचं होतं. त्यानंतर मग मााझी या भूमिकेसाठी निवड झाली. या सगळ्यानंतर गडकरी सरांची भूमिका साकारण्यासाठी मी तयारी केली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू याचा मी अभ्यास केला. ते बोलताना, भाषण करताना, लोकांशी संवाद साधताना, घरच्यांशी बोलताना सर कसे वागतात. ते निर्णय कसे घेतात, हे हळूहळू समजत गेलं. त्यानंतर अनुरागने माझ्यासाठी एक वर्कशॉप ठेवलं होतं. या बॅकग्राऊंडचा नसल्यामुळे मला थोडीशी मेहनत करावी लागली. पण, हे सगळं मला आवडायला लागलं होतं," असंही त्यांनी सांगितलं. 

नितीन गडकरींची भूमिका साकारण्यासाठी नेमकी काय तयारी केली, याबाबतही त्यांनी या मुलाखतीत भाष्य केलं. ते म्हणाले, "मी नितीन गडकरी सरांचं पुस्तक वाचलं. त्यांचे काही व्हिडिओ बघितले. त्यांचे हावभाव, बोलण्याची स्टाइल बघितली. त्यांच्यातील आत्मविश्वास हा गुण मला फार आवडतो. गडकरी सरांच्या मित्रांबरोबर मी बोललो. त्यातून मला काही गोष्टी समजल्या. या वर्कशॉपनंतर त्यांची भूमिका मी साकारू शकतो, हा आत्मविश्वास माझ्यात आला." 

Web Title: gadkari biopic rahul chopda revealed how he get the role of minister nitin gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.