"मी ख्रिश्चन कुटुंबात जन्माला आले, त्यामुळे.."; धर्मांतर केल्याच्या चर्चांवर राजेश्वरीने सोडलं मौन, म्हणाली-
By देवेंद्र जाधव | Updated: June 15, 2025 18:11 IST2025-06-15T18:06:31+5:302025-06-15T18:11:03+5:30
राजेश्वरीने धर्मांतर केल्याच्या चर्चांवर पहिल्यांदाच मोठं विधान केलंय. राजेश्वरीने स्वतःच्या धर्माविषयी सांगितलेली ही गोष्ट आजवर कुठेच बोलली नाहीये

"मी ख्रिश्चन कुटुंबात जन्माला आले, त्यामुळे.."; धर्मांतर केल्याच्या चर्चांवर राजेश्वरीने सोडलं मौन, म्हणाली-
काही दिवसांपूर्वी 'फँड्री' फेम अभिनेत्री राजेश्वरी खरातने एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत तिने खाली लिहिलेल्या कॅप्शनमुळे राजेश्वरीने ख्रिश्चन धर्म स्वीकारून धर्मांतर केलं, असं बोललं जाऊ लागलं. राजेश्वरीला यामुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत राजेश्वरीने धर्मांतर केलं की नाही, याविषयी खुलासा केला. ती म्हणाली, "मला असं सांगायचंय की, ख्रिश्चन घरातच माझा जन्म झाला. मी लहानपणापासूनच ख्रिश्चन आहे. मी कोणता धर्म बदलला नाही."
"मला एकच खंत आहे की, लोकांचा जो दृष्टीकोन आहे तो खूप मर्यादित आहे. तो इतका मर्यादित आहे की, त्यांना सत्य बघायचं नाहीये. काहीतरी पाहिलं आणि काही विचार न करता धडाधड कमेंट्स टाकल्या. तुम्ही जाणून घ्या ना आधी, काय आहे नेमकं. तुम्हाला माझी पार्श्वभूमी माहित नाही. लोकांचं असंय की, त्यांना स्पॉटलाईटमध्ये राहायला फार आवडतं. कारण कमेंट्समध्ये येऊन चुकीचं लिहिणार. आणि DM मध्ये येऊन तीच लोक आय लव्ह यू राजेश्वरी, आय मिस यू असं बोलणार."
"मला असं वाटतं की, मी त्यांची बाजू समजून घेऊ शकते. प्रत्येकाला प्रत्येकाचं मत असतं. कारण धर्म बदलणं किंवा अशा काही गोष्टी करणं हा प्रत्येकाचा निर्णय आहे. त्यामुळे लोकांनी त्याच्यावर टीका करणं चुकीचं आहे. दुसरं मला वाटतं, जे लोक टीका करतात ना, त्यांच्या आयुष्यात खूप तणाव, नैराश्य आहे. हे लोक अयशस्वी लोक असतात. हा सर्व त्रास घेऊन त्यांना एक जागा भेटते ती म्हणजे सोशल मीडिया. आणि असं काही दिसलं की, त्यांचा अयशस्वीपणा, रुबाब, राग, द्वेष सर्व घेऊन कमेंट्समध्ये ओतायचं."
"मी त्यांनाही काय म्हणत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करा. इथे येऊन काहीही माहिती न घेता उगाच का दुसऱ्याला टार्गेट करायचं. तुम्ही योग्य त्या भाषेतही सांगू शकता. माझी बाजू जाणून न घेता तुमचं आपलं चाललंय. हे योग्य नाही. फक्त स्वतःला फोकस करुन घ्यायचं असतं. मला ट्रोलिंगचा खूप फायदा होतो. वाईट एवढंच वाटतं की, लोक कोणतीही गोष्ट बोलतात. मला आधी त्रास व्हायचा, मी रडायचे. नंतर मला कळालं याच लोकांचं त्यांच्या आयुष्यात काही खरं नाहीये त्यामुळे ते तिथे येऊन दुसऱ्यांना टार्गेट करतात. त्यामुळे मी धर्म बदलला नाही. मी ख्रिश्चनच आहे."