"बाहेरच्यांशी भांडण्यापेक्षा आपल्यात मराठी रुजवणं गरजेचं" क्षितीज पटवर्धन स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 14:54 IST2025-04-22T14:53:18+5:302025-04-22T14:54:42+5:30
क्षितीज पटवर्धन याने मराठी भाषेच्या संदर्भात खणखणीत आणि स्पष्ट वक्तव्य केलं आहे.

"बाहेरच्यांशी भांडण्यापेक्षा आपल्यात मराठी रुजवणं गरजेचं" क्षितीज पटवर्धन स्पष्टच बोलला
Kshitij Patwardhan: लहान मुलांमध्ये मराठी भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी, तसंच आजच्या काळात होत असलेला मोबाइलचा वापर कमी व्हावा, या हेतूनं रंगभूमीवर आलेल्या या नाटकानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. क्षितीज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित 'आज्जीबाई जोरात' नाटकाचा नुकताच १०० वा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी खास उपस्थिती लावली होती. याचेच औचित्य साधत लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनने 'आज्जीबाई जोरात' नाटकाच्या १०० व्या प्रयोगाच्या खास क्षणाचे फोटो शेअर केलेत. तसेच या पोस्टमधून त्यानं मराठी भाषेच्या संदर्भात एक खणखणीत आणि स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
क्षितिज पटवर्धन याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. दिग्दर्शकानं शेअर केलेल्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये त्यानं "बाहेरच्यांशी भांडण्यापेक्षा आपल्यात मराठी रुजवणं गरजेचं" असल्याचं स्पष्ट मत मांडलं. यासोबतचं "मराठीचा मक्ता घेण्यापेक्षा मराठीची पताका घेणं गरजेचं" असल्याचंही त्यानं अधोरेखीत केलं. पोस्टमध्ये तो म्हणाला. "काल (२० एप्रिल) सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी १००व्या प्रयोगाला येऊन आमचा फक्त उत्साहच वाढवला नाही, तर मराठी पुढच्या पिढीत रुजवण्यासाठी आणि मुलामधलं स्क्रीन ॲडिक्शन कमी करण्यासाठी नाटकाला सहकार्य करण्याची खात्री सुद्धा दिली. त्यांचे खरोखर मनःपूर्वक आभार".
पुढे तो म्हणाला, "कालचा प्रतिसाद अक्षरशः अविस्मरणीय होता. मराठी आतून बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही गेले वर्षभर करत आहोत. नव्या पिढीत आजवर जवळपास २५००० मुलांना मराठी भाषेची गंमत, बोलीभाषांचं महत्व, मराठी संस्कृती, साहित्य परंपरा या सगळ्याबद्दल भव्य दिव्य पद्धतीने मांडलं आहे, पुढेही मांडू! बाहेरच्यांशी मराठीवरून भांडण्यापेक्षा आपल्या आत मराठी रुजवणं जास्त गरजेचं आहे असं वाटतं. त्यासाठी मराठी कला, साहित्य, सिनेमा, नाटक यांचा चांगला अनुभव देणं ही बनवणाऱ्यांची आणि घेणं हे रसिकांची जबाबदारी आहे. त्यानेच व्यवसाय, संस्कृती आणि पर्यायाने भाषा सुद्धा जिवंत राहील!
पुढे तो म्हणाला, "मराठीचा मक्ता घेण्यापेक्षा मराठीची पताका घेणं गरजेचं आहे जी एका पिढीतून दुसऱ्या पिढीत देता येईल! काल जितेंद्र जोशी या जिवलग मित्राच्या सांगण्यावरून “आज्जीबाई जोरात! म… मराठीचा!” अशी टॅग लाईन करतो आहोत. तुम्हाला कशी वाटतेय नक्की सांगा", असं त्यानं म्हटलं. क्षितिज पटवर्धनची ही खास पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. त्यानं मराठी भाषेविषयी मांडलेलं मत अनेकांना पटलं आहे. मराठीप्रेमी, लेखक, सेलिब्रिटी, आणि युवक- युवतींनी त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्यात.