Exclusive : लंडनमध्ये पार पडणार सोनाली कुलकर्णीचा लग्नसोहळा, कसा? ‘अप्सरे’कडूनच ऐका...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 17:48 IST2022-05-02T17:42:44+5:302022-05-02T17:48:38+5:30
Sonalee Kulkarni : महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीनं गेल्यावर्षी 7 मे रोजी कुणाल बेनोडकरशी लग्नगाठ बांधली होती. येत्या 7 मे रोजी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनाली व कुणाल पुन्हा विधिवत लग्न करणार आहेत.

Exclusive : लंडनमध्ये पार पडणार सोनाली कुलकर्णीचा लग्नसोहळा, कसा? ‘अप्सरे’कडूनच ऐका...
महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीनं (Sonalee Kulkarni) गेल्यावर्षी 7 मे रोजी कुणाल बेनोडकरशी लग्नगाठ बांधली होती. दुबईतील एका मंदिरात हे लग्न पार पडलं होतं. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे सोनाली व कुणाले कुटुंबीय, मित्रपरिवार कोणीच या लग्नाला उपस्थित नव्हतं. अगदी सोनाली व कुणालचे आईवडील व्हर्चुअली (झूम कॉलद्वारे) या लग्नाचे साक्षीदार झाले होते. येत्या 7 मे रोजी सोनाली व कुणालच्या लग्नाला वर्ष पूर्ण होत आहे आणि लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनाली व कुणाल पुन्हा विधिवत लग्न करणार आहेत.
हा लग्नसोहळा लंडनमध्ये पार पडणार आहे. हा लग्नसोहळा कसा होणार आहे, याबद्दलचा खुलासा खुद्द सोनालीने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
7 मे रोजी सोनाली लग्न करतेय, ही बातमी सध्या चर्चेत आहे. काय स्पेशल असणार आहे? असा प्रश्न सोनालीला यावेळी करण्यात आला. यावेळी सोनालीने सर्वप्रथम हा प्रश्न विचारल्याबद्दल ‘लोकमत फिल्मी’चे आभार मानलेत. हा प्रश्न विचारल्याबद्दल आभार. कारण यानिमित्ताने मला लोकांना स्पष्टीकरण देता येईल, असं ती म्हणाली.
काय म्हणाली सोनाली?
ती म्हणाली, 7 मे 2021 रोजी कोरोना महामारीमुळे दोनवेळा कॅन्सल झालेलं आमचं लग्न आम्ही रजिस्टर केलं दुबईमध्ये. मी आणि माझा नवरा केवळ आम्ही दोघंच होतो आणि आमच्या कुटुंबानं झूम कॉलवरती तो क्षण अनुभवला. पण अर्थात आम्हाला विधी करायच्या होत्या. मी तेव्हाही सांगितलं होतं की, जेव्हा परिस्थिती सामान्य होईल, तेव्हा आम्ही विधी करू. विधीनिशी लग्न माझं पहिल्यांदाच होतंय आणि शेवटचं होणार आहे. विधी करण्यामागे आमच्या भावना जुळलेल्या आहेत. त्यामुळे चुकीच्या हेडलाईन्स देऊन आमच्या भावना दुखावू नये, अशी मी तमाम मीडियाला विनंती करीन. माझे आईवडिल, त्याचे आईवडिल सर्व असतील. हा एक कौटुंबिक सोहळा असेल. पण यावेळी तो लंडनमध्ये असणार आहे. कारण इथे खूप गर्मी आहे, असं सोनाली म्हणाली.