'तुला पाहते रे'मधील ईशा म्हणजेच गायत्री दातार 'ह्या' चित्रपटातून करणार रुपेरी पडद्यावर एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 19:50 IST2019-03-27T19:49:33+5:302019-03-27T19:50:22+5:30
गायत्री दातार आता लवकरच ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे.

'तुला पाहते रे'मधील ईशा म्हणजेच गायत्री दातार 'ह्या' चित्रपटातून करणार रुपेरी पडद्यावर एन्ट्री
झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील विक्रांत सरंजामे व ईशा दातार या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. विक्रांत सरंजामेची भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारतो आहे तर ईशाची भूमिका अभिनेत्री गायत्री दातार करते आहे. गायत्रीची ही पहिलीच मालिका आहे. आता लवकरच ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे. हो, हे वृत्त खरे आहे.
गायत्री दातार 'कोल्हापूर डायरिज' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सुपरहिट मल्याळम चित्रपट 'अंगमली डायरीज'चा मराठी रिमेक आहे.
या चित्रपटाबद्दल गायत्री दातारने मराठी बॉक्स ऑफिस या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ''कोल्हापूर डायरीज' या चित्रपटामध्ये मी कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या मुलीचे पात्र साकारले आहे. ती इतर मुलींपेक्षा खूप वेगळी आहे. आता मालिकेतील माझी भूमिका पाहता सगळे मला ईशा म्हणून ओळखतात पण चित्रपटातील भूमिकेतून प्रेक्षक मला अगदीच वेगळ्या भूमिकेत पाहणार आहेत. मालिकेतील ईशा जशी साधी आहे तसे चित्रपटातील माझी भूमिका त्याविरुद्ध असणार आहे.'
'कोल्हापूर डायरिज' चित्रपटात गायत्री दातारसोबत भूषण नानासाहेब पाटील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जो राजन यांनी केले आहे. तर संगीतकार अवधूत गुप्ते या चित्रपटाचा सादरकर्ता आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.