गिनीज बुकमध्ये डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन या चित्रपटाचा समावेश होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 11:30 IST2017-02-16T06:00:53+5:302017-02-16T11:30:53+5:30
रिले सिंगिंग या गाण्याच्या प्रकारात एकावेळी एकापेक्षा अधिक गायक एकत्र येऊन गाणे गातात. एकाच सूरात, लयीत गाताना गाण्यातील एक ...
गिनीज बुकमध्ये डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन या चित्रपटाचा समावेश होणार का?
र ले सिंगिंग या गाण्याच्या प्रकारात एकावेळी एकापेक्षा अधिक गायक एकत्र येऊन गाणे गातात. एकाच सूरात, लयीत गाताना गाण्यातील एक एक शब्द फक्त एक गायक गातो. रिले सिंगिंग यापूर्वी २००६ मध्ये युनायटेड किंगडममधील जॉन बॅल स्कूलमध्ये झाले होते. त्यावेळी २८८ विद्यार्थ्यांनी एकत्र गाणे गात वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. त्याचप्रमाणे २०१४ मध्ये राजस्थानमधील संतोष रुंगटा इन्स्टिट्यूटमध्येही हा रेकॉर्ड करण्यात आला. मात्र रिले सिंगिंग हा प्रकार कधी भारतीय चित्रपटसृष्टीत अनुभवायला मिळाला नव्हता. पण पहिल्यांदाच हा प्रयोग डॉ. तात्या लहाने या चित्रपटात होणार आहे. रिले सिंगिंगच्या प्रयोगाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी विराग वानखडे प्रयत्न करणार आहेत. कलर्स वाहिनीवरील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अब इंडिया तोडेगा या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून १५५ तबला वादकांसोबत सातत्याने दीड मिनिटे एकाच सूरात तबला वादनाचा रेकॉर्ड त्यांनी केला आहे. आता रिले सिंगिंगचा रेकॉर्डदेखील यशस्वी होईल असा त्यांना ठाम विश्वास आहे. या उपक्रमासाठी ऑडिशन्स घेतल्या जाणार आहेत. आतापर्यंत ५०० जणांनी या उपक्रमासाठी ऑडिशन्स दिल्या असून या ऑडिशन्स महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू राहाणार आहेत. विराग हेच या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. काळोखाला भेदून टाकू... जीवनाला उजळून टाकू या गाण्यावर आधारित हे रिले सिंगिंग असणार आहे. एकूण १०८ शब्दांचे असलेले हे गाणे ३०० गायक एकाच लयीत-सूरात गाणार आहेत. डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन या सिनेमातील हे मूळ गीत विराग यांनी शब्दबद्ध केले असून साधना सरगम आणि त्यांनी हे गाणे गायले आहे. एक हिंदुस्थानी या संगीतकाराने हे गाणे कम्पोझ केले आहे. रिले सिंगिंगचा सिनेमाच्या प्रमोशनसाठी वापर करणे हा भारतीय चित्रपटसृष्टीत पहिलाच प्रयोग असल्याने याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या गाण्याच्या माध्यमातून डॉ लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना वाहण्यात आली आहे. त्यांचे समाजकार्य जगातील कानाकोपऱ्यात पोहोचावे या उद्देशाने हा सिनेमा करत असल्याचे निर्माते-दिग्दर्शक विराग सांगतात. गिनीज बुकमध्ये या गाण्याचा समावेश होतो की नाही हे आपल्याला काहीच दिवसांत कळेल.