दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार, केरळच्या प्रेक्षकांसाठी खास भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 19:32 IST2025-10-26T19:32:20+5:302025-10-26T19:32:48+5:30
'दशावतार' हा सुपरहिट मराठी सिनेमा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही धडक देण्यासाठी सज्ज झाला आहे.

दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार, केरळच्या प्रेक्षकांसाठी खास भेट
गेल्या काही महिन्यांपासून सिनेमागृहांमध्ये आपल्या दमदार कथेमुळे आणि उत्कृष्ट सादरीकरणामुळे प्रचंड प्रतिसादात सुरु असलेला मराठी चित्रपट 'दशावतार' (Dashavatar) आता एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता मराठी भाषेच्या सीमा ओलांडून थेट मल्याळी भाषेत (Malayalam) प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण होत असतानाच, मल्याळी भाषेत त्याचे पदार्पण होणे हा 'दुग्ध शर्करा योग' मानला जात आहे.
झी स्टुडिओजची प्रस्तुती आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेला सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित 'दशावतार'हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. त्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. महाराष्ट्रासोबतच बडोदा, इंदूर, हैद्राबाद, बंगळुरू, दिल्ली ते थेट गुवाहाटीपर्यंत 'दशावतार' हाऊसफुल होऊ लागला. अनेक अमराठी प्रेक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले.
अमेरिकेपासून ऑस्ट्रेलिया, जपानपर्यंत आणि संयुक्त अरब अमीरातीपासून जर्मनी, नॉर्वेपर्यंत सगळीकडे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. या चित्रपट सातव्या आठवड्यात प्रवेश केलाय. तरीही आजही अनेक चित्रपटगृहात दमदारपणे सुरू आहे. चित्रपटाला देशभरात आणि विदेशात मिळालेल्या यशामुळे इतर भाषिक प्रेक्षकांमध्येही ‘दशावतार’बद्दल मोठे कुतूहल निर्माण झाले. याचाच परिणाम म्हणून, केरळमधील प्रेक्षकांच्या जोरदार आग्रहाखातर तो आता मल्याळी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
नुकतेच या चित्रपटाचे मल्याळी भाषेतले पोस्टर प्रदर्शित झाले असून, २१ नोव्हेंबर रोजी 'दशावतार' केरळमध्ये प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपट मल्याळी भाषेतून केरळमध्ये प्रदर्शित होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. उत्तम कथा व सादरीकरणाच्या जोरावर मराठी चित्रपट आपल्या कक्षा रुंदावत मोठी झेप घेऊ शकतो, हे 'दशावतार'ने सार्थ करून दाखवले आहे.