"एक मुलगी आत्महत्या करणार होती, तिचा मेसेज आला अन्.."; क्षितीश दातेने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
By देवेंद्र जाधव | Updated: July 25, 2025 16:33 IST2025-07-25T16:31:57+5:302025-07-25T16:33:24+5:30
धर्मवीर फेम क्षितीश दातेने सांगितलेला हा खास किस्सा वाचून तुमच्याही अंगावर शहारा येईल. काय घडलं होतं नेमकं?

"एक मुलगी आत्महत्या करणार होती, तिचा मेसेज आला अन्.."; क्षितीश दातेने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
क्षितीश दाते हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. क्षितीशला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. 'धर्मवीर' सिनेमात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारुन क्षितीशने सर्वांचं मन जिंकलं. क्षितीशला सध्या अनेक चाहते भेटत असतात. अशातच क्षितीशने लोकमत फिल्मीशी बोलताना त्याच्या अशाच एका चाहतीचा किस्सा सांगितला आहे. आत्महत्या करायला गेलेली चाहती क्षितीशची कलाकृती पाहून कशी परावृत्त झाली, याचा किस्सा अभिनेत्याने सांगितलाय.
क्षितीशने सांगितला खास किस्सा
क्षितीशचं सध्या रंगभूमीवर 'मी vs मी' हे नाटक सुरु आहे. या नाटकात क्षितीश प्रमुख भूमिकेत आहे. या नाटकाविषयीच सांगताना क्षितीशने अंगावर काटा आणणारा किस्सा सांगितला. क्षितीश म्हणाला, "तू प्लीज नाटक बघायला ये. तुझं तुलाच कळेल की लोक कोणत्या पद्धतीने प्रतिसाद देतात. आमचं मनोरंजन नाटक आहे, त्यात ह्यूमरपण आहे पण विषय गंभीर आहे. आमची इतकी चांगली टीम जमलीये. आमचं नाटक 'जगावंसं वाटणं की न वाटणं', याविषयी आहे."
"गेल्या आठवड्यात मुलीचा मेसेज आला होता. मी दोनवेळा स्वतःचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केलाय. मी त्यात यशस्वी झाले नव्हते. मी आयुष्यात पहिलं नाटक बघितलं ते हे नाटक बघितलं. त्यामुळे माझ्या आयुष्याचा आणि जीवनाचा नवीन टप्पा सुरु झालाय. हे नाटक बघून मी इतकी आशावादी झालेय. हा मेसेज वाचताच आमच्या डोळ्यात पाणी आलं."
"प्रत्येक कलाकृती फार मोठा सामाजिक बदल घडवू शकत नाही. पण एका माणसाच्या आयुष्याला जरी असा स्पर्श झाला असेल तरी जे काही करतोय त्या सगळ्याचं सार्थक झाल्यासारखं आहे. त्यामुळे याचं असेलच क्रेडिट तर आमच्या नाटकाचा लेखक-दिग्दर्शक संजय जमखिंडीचं आहे. फार बरं वाटतं असं झाल्यानंतर. नाटक खूप चांगलं चाललंय. लोक रिपिट सुद्धा येत आहेत. आमचे ३३-३५ प्रयोग झालेत. पण तरीही ऑलरेडी ६ वेळा नाटक बघितलेली नाटक बघायला लोक येतात."