"मराठी सिनेमांना थिएटर मिळायला त्रास व्हायचा, पण आता..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं 'दशावतार'चं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:00 IST2025-10-08T13:58:19+5:302025-10-08T14:00:51+5:30
'दशावतार' सिनेमाचा उल्लेख करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कुमारसमोर मराठी सिनेमाचं कौतुक केलं आहे

"मराठी सिनेमांना थिएटर मिळायला त्रास व्हायचा, पण आता..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं 'दशावतार'चं कौतुक
मराठी सिनेमा 'दशावतार'चं चांगलंच कौतुक होतंय. चौथ्या आठवड्यातही 'दशावतार' सिनेमा थिएटरमध्ये गर्दीत सुरु आहे. 'दशावतार' सिनेमाचं सामान्य प्रेक्षकांपासून राजकीय व्यक्ती आणि सेलिब्रिटींनी चांगलीच प्रशंसा केली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात 'दशावतार' सिनेमाचा उल्लेख करुन मराठी सिनेमांचं कौतुक केलं आहे.
फडणवीसांनी केलं दशावतारचं कौतुक
फिक्की फ्रेम्स (FICCI Frames) च्या कार्यक्रमादरम्यान अक्षय कुमारने विचारलेल्या प्रश्नाला मुख्ममंत्री फडणवीस म्हणाले की, ''मला असं वाटतं की, क्रिएटिव्हिटीची आणि अभिव्यक्तीची उदाहरणं मराठी थिएटरमध्ये कायम आहेत. मराठी प्रेक्षक सुद्धा खूप उत्साही आहेत. आजही महाराष्ट्रात इतकी मराठी नाटकं तयार होतात. ही नाटक बघण्यासाठी थिएटरच्या बाहेर लोकांची गर्दी असते. तीच नाटकं चालतात. त्यामुळे हीच क्रिएटव्हिटी आज मराठी सिनेमातही बघायला मिळते.''
''नटरंग सारखा एखादा सिनेमा येतो, किंवा मराठीतील जुने सिनेमे आहेत. सध्या दशावतार किंवा सखाराम बाईंडर नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. या कलाकृती जेन झी पिढीलाही आवडत आहेत. लोकांना या गोष्टी आवडत आहेत. त्यामुळे मला वाटतं, मराठी प्रेक्षक जो आहे किंवा जेन झी आहेत ते या गोष्टींशी जोडले जात आहेत. एक काळ असा होता की, मराठी सिनेमांना थिएटर मिळायला त्रास व्हायचा. ब्लॉकबस्टर सिनेमा येत असेल तर, मराठी सिनेमांचं रिलीज थांबवावं लागायचं. पण आज अशी स्थिती आहे की, एकाच दिवशी दोन मराठी सिनेमे रिलीज होत आहेत, आणि दोन्ही सिनेमे सुपरहिट होत आहेत. त्यामुळे सिनेमे लोकांना आवडत आहेत.''