"कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण...", प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहरेची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:15 IST2025-09-01T12:14:10+5:302025-09-01T12:15:16+5:30

Priya Marathe : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं कर्करोगाने निधन झालं आहे. ती ३८ वर्षांची होती. तिने सोशल मीडियावर प्रिया मराठेचे फोटो शेअर करत भावुक पोस्ट शेअर केली आहे.

''Cancer ravaged her body, but...'', Prarthana Beherea's emotional post after Priya Marathe's death | "कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण...", प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहरेची भावुक पोस्ट

"कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण...", प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहरेची भावुक पोस्ट

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे(Priya Marathe)चं कर्करोगाने निधन झालं आहे. ती ३८ वर्षांची होती.  तिच्या निधनामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीने एक गुणी कलाकार गमावला आहे. प्रिया मराठेच्या निधनानंतर बरेच मराठी कलाकारांनाही धक्का बसला आहे. पवित्र रिश्ता मालिकेतील प्रियाची सहकलाकार अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिलादेखील धक्का बसला आहे. तिने सोशल मीडियावर प्रिया मराठेचे फोटो शेअर करत भावुक पोस्ट शेअर केली आहे.

प्रार्थना बेहरेच्या अलिबागमधील फार्म हाउसवर प्रिया मराठे मागील वर्षी गेली होती. त्यावेळचे तिचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने भावुक पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले की, ''ए वेडे प्रिया, पियू, परी, प्री, ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती, ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याच्याची मैत्रीण होती. माझी वेडे ... आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं. कितीतरी वेळा आम्ही तासन्‌तास बोलत बसायचो…मॅगी, भुर्जी, कॉफी… हे सगळं आमचं छोटंसं जग होतं. खूप साऱ्या गप्पा, काहीसं वेडं हसणं, रात्री उशिरापर्यंत जागणं त्या क्षणांना काही तोड नाही.''


तिने पुढे लिहिले, ''ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती – आणि खरी सख्खी मैत्रीण. तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं. तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं, हसावं, रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं. अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा सर्व काही नवीन, अनोळखी आणि वाटायचं, तेव्हा तिचं हसतं मुख, तिचं प्रेमळ बळ माझ्यासोबत होतं. तिच्यासोबत मी पहिला सीन केला, पहिल्यांदा कॅमेरा शेअर केला. ती इतकी हसमुख , प्रामाणिक, भावनाशील आणि जिव्हाळ्याने भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभरही घालवला, तरी तो कायमचा लक्षात राहिला.'' 

''कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण...''

''कॅन्सरशी लढा देत असताना, एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली. तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती. मी, ती आणि शाल्मली आम्ही तिघींनी एकत्र इतका सुंदर वेळ घालवला की तो क्षण कायमचा मनात कोरला गेला आहे. ती खूप आनंदी होती…तेव्हा तिने मला एका शांत स्वरात म्हटलं, “तुझं घर, तुझं वातावरण, तुझे हे कुत्रे… हे सगळं मला बरे करतंय. मला इथे येऊन बरं वाटतंय… जणू काही हे ठिकाणच मला बरं करतंय.” कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण तिचं मन, तिचा आत्मा, तिचं खंबीरपणं – ते कोणतंही आजार हरवू शकला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं. ती गेली, पण तिच्या आठवणी, तिचं हास्य, तिचं अभिनयातलं तेज — सगळं अजूनही माझ्यासोबत आहे. माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबतच गेला, आणि तो भाग मी जपून ठेवणार आहे कायमचं'', असे प्रार्थनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले.

Web Title: ''Cancer ravaged her body, but...'', Prarthana Beherea's emotional post after Priya Marathe's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.