Bus Bai Bus show : मैत्री वगैरे नाही..., अमृता खानविलकरबद्दल स्पष्टच बोलली सोनाली कुलकर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 17:15 IST2022-09-18T17:12:57+5:302022-09-18T17:15:30+5:30
Bus Bai Bus, Sonalee Kulkarni : फिल्म इंडस्ट्रीतील्या अभिनेत्रींमध्ये कधीच मैत्री होऊ शकत नाही, असं सर्रास म्हटलं जातं. सोनाली नेमकी यावरच बोलली

Bus Bai Bus show : मैत्री वगैरे नाही..., अमृता खानविलकरबद्दल स्पष्टच बोलली सोनाली कुलकर्णी
झी मराठीवरच्या ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) या कार्यक्रमातील महिला सेलिब्रिटी आणि त्यांच्या धम्माल गप्पा म्हणजे, प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणीच. शोच्या प्रत्येक नव्या एपिसोडमध्ये राजकारणापासून मनोरंजन विश्वातील महिला सेलिब्रिटी येतात आणि प्रेक्षकांना त्यांच्या मनातील उत्तरं मिळतात. नुकतंच ‘बस बाई बस’च्या मंचावर महाराष्ट्राची ‘अप्सरा’ अर्थात सोनाली कुलकर्णीने (Sonalee kulkarni ) हजेरी लावली आणि यावेळी तिने केलेला खुलासा ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
फिल्म इंडस्ट्रीतील्या अभिनेत्रींमध्ये कधीच मैत्री होऊ शकत नाही, असं सर्रास म्हटलं जातं. सोनाली नेमकी यावरच बोलली. अमृता खानविलकर (Amruta khanvilkar) व तिच्यात मैत्री की वैर? याचं स्पष्ट उत्तर तिने यावेळी दिलं.
‘बस बाई बस’ कार्यक्रमात, पाहुण्या सेलिब्रिटीला काही फोटो दाखवले जातात आणि त्या फोटोबद्दलच्या खऱ्या खऱ्या भावना सेलिब्रिटीला सांगायच्या असतात. यावेळी सोनालीला अमृता खानविलकरचा फोटो दाखवला गेला. हा फोटो पाहून सोनालीनं अशी काही प्रतिक्रिया दिली की सध्या त्याचीच चर्चा रंगलीये.
अमृता खानविलकरचा फोटो पाहून सुरूवातीला काय बोलावं हेच सोनालीला सुचेना. पण पुढे ती बोलली. ‘आपण दोघींनी करिअरची सुरूवात एकत्रच केली. आपण एकमेकींचा स्ट्रगल पाहिला. नटरंगचं यश शेअर केलं. पण त्यानंतर इतक्या वर्षांत आपण एकत्र काम केलं नाही. एकत्र काम केलं असतं तर कदाचित आपली छान मैत्री झाली असती. नटरंगनंतर आपल्यात वैर असल्याचं पसरवलं गेलं. आमच्यात काही फार मैत्री वगैरे नाही. पण हो, ती होऊ शकली असती. मात्र लोकांना दोन यशस्वी असलेल्यांना एकत्र बघायला आवडत नाही. तसं झालं असावं. काही समज, गैरसमज नक्कीच झाले असतील. पण इतक्या वर्षानंतर एकमेकांना आपण समजून घेऊ शकतो. तू जो स्ट्रगल केलास मी तो केला असं म्हणणार नाही. कारण प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा असतो. तसाच संघर्ष मी केलाय, तो तुलाही माहिती आहे. त्याबद्दल मला आदर आहे. आपण एकत्र काम केलं तर आपल्यात नक्की मैत्री होईल, तोपर्यंत त्याची वाट पाहू..., असं सोनाली म्हणाली.
अन्य एका मैत्रिणीचा फोटो दाखवल्यावर सोनाली ढसाढसा रडते. तिचं हे भावुक करणारं रूपही या कार्यक्रमादरम्यान पाहायला मिळालं.