बर्नी मध्ये तेजस्वीनीची जादु
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 13:38 IST2016-05-16T08:08:47+5:302016-05-16T13:38:47+5:30
मराठी चित्रपटात आता नवनवीन विषय मांडण्यात येत आहेत. आता यामध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. तो चित्रपट म्हणजे ...

बर्नी मध्ये तेजस्वीनीची जादु
आजच्या सुशिक्षित महिलांचे भावविश्व उलगडणाऱ्या "बर्नी"चे दिग्दर्शन नीलिमा लोणारींच असून त्यांनी यापूर्वी एकूण तीन भिन्न जातकुळीच्या चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शन केले आहे. प्रा. सुभाष भेंडे यांच्या 'जोगीण' या कादंबरीवरून प्रेरित होऊन "बर्नी" या चित्रपटाच्या कथेचा विस्तार आणि पटकथा नीलिमा लोणारी यांनी लिहिली असून संवाद सचिन दरेकर यांचे आहेत. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने या चित्रपटातील "बर्नी"च्या प्रमुख भूमिकेत विशेष रंग भरले आहेत.
गोमंतकाच्या निसर्गरम्य परिसरात शांत सुशेगात सरंजामदारीचा प्रभाव असलेल्या खानदानात "बर्नी"चा जन्म. उसळत्या रक्ताची, सर्वांशी मिळून मिसळून उत्साही, खेळकर तारुण्याने बहरलेली, मादक, मोहक, अल्लड "बर्नी" कोणालाही हेवा वाटावी… कोणीही तिच्यावर लुब्ध व्हावे… भरपूर शेतीवाडी असणारे तिचे वडील जमीनदार. सैन्यातून निवृत्त होऊन सुखवस्तू जीवन जगात आहेत. आपल्या मुलीची, बर्नीची कोणतीही इच्छा, हौस आनंदाने, पूर्ण करणारी तिची सुंदर सुस्वभावी पोर्तुगीज आई, आकर्षक शेतीवाडी आणि घरदार यात रमलेली. पोर्तुगीज जीवनशैलीत रमलेली आपल्या मुलांवर आणि नवऱ्यावर जीव ओवाळून टाकणारी.
"बर्नी"चे उमलते उत्फुल्ल यौवन… कॉलेज क्वीन… तिच्या भोवती असलेला तरुणांचा घोळका. या घोळक्यात तिच्यावर फिदा झालेला राजकुमार. दोघांचं प्रेम फुलत जातं. पण तिच्या वडिलांची तब्येत एकाकी एकदम बिघडते आणि तिचं आयुष्य एक वेगळ वळण घेते. वडिलांच्या आजारपणात तिला वडिलांना एक वचन द्यावे लागते ज्यामुळे तिला आपलं घर आणि आपल्या माणसांपासून दूर निघून जावं लागतं. तिच्या पुढच्या वादळी संघर्षमय प्रवासात मात्र ती अधिक प्रगल्भ बनत जाते आणि शेवटी या खोट्या, दांभिक जगाशी दोन हात करत समाजात स्वतःच एक आदर्श स्थान निर्माण करते.
अमितराजचे गोव्याच्या कल्चरला धरून तयार केलेले संगीत, श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या गोवन कल्चरल पार्टी साँगची धम्माल उमेश जाधवच्या नृत्य दिग्दर्शनामुळे या चित्रपटाची अधिक रंजक वाढली आहे. नीलकांती पाटेकर, राजन ताम्हाणे, भूषण पाटील, गिरीश परदेशी, सविता मालपेकर, किरण खोजे, सुमुखी पेंडसे, मौसमी तोंडवळकर, चैत्राली डोंगरे, राज हंचनालळे, राधिका देशपांडे इत्यादी कलावंतांच्या भूमिका आहेत.