ब्रेक तो बनता है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 11:00 IST2016-08-23T05:30:27+5:302016-08-23T11:00:27+5:30

अभिनेता चिन्मय मांडलेकरने अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशा सगळ्याच भूमिका यशस्वीपणे साकारल्या आहेत. आता आवाज या सिरिजमधील जोतिबा आणि सावित्रीबाई फुले ...

The brakes are made! | ब्रेक तो बनता है!

ब्रेक तो बनता है!

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अभिनेता चिन्मय मांडलेकरने अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशा सगळ्याच भूमिका यशस्वीपणे साकारल्या आहेत. आता आवाज या सिरिजमधील जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या मालिकेद्वारे तो निर्मितीक्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याच्या या नव्या इनिंगबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा... 
 
जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या मालिकेची निर्मिती करण्याचा विचार तू कसा केलास?
कलर्स मराठी वाहिनीच्या तू माझा सांगाती या मालिकेत मी काम करत आहे तर याच वाहिनीवरील सरस्वती ही मालिका मी लिहित आहे. त्यामुळे माझा आणि वाहिनीच्या मंडळींचा नेहमीच संपर्क असतो. आवाज या सिरिजविषयी त्यांनी मला सांगितले त्यावेळी मला या मालिकेची संकल्पना आवडली आणि मी निर्मितीसाठी होकार दिला. या मालिकेचे लेखनदेखील मीच केले आहे. यात मला उन्मेष अमृतेने खूप मदत केली. महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी खूप काही लिहिलेले आहे. तसेच त्यांनी स्वतः लिहिलेली अनेक पुस्तके आहेत. त्यामुळे संशोधनासाठी मी काय काय वाचू असा मला प्रश्न पडला होता. चित्रीकरणामुळे माझ्याकडे तितकासा वेळही नव्हता. त्यावेळी उन्मेषने महात्मा फुले यांच्यासंबंधित असलेली सगळी पुस्तके वाचली आणि पुस्तकांमधील कोणता भाग मी वाचला पाहिजे हे सुचवले. त्यामुळे माझे काम खूपच सोपे झाले. तसेच मालिकेत कोणकोणती पारंपरिक गाणी वापरता येतील हे देखील त्यानेच सांगितले. 
महात्मा जोतिबा फुले यांची भूमिका साकारण्यासाठी तू प्रसाद ओकचीच निवड का केली?
महात्मा जोतिबा फुले यांचा फोटो पाहिल्यानंतर माझ्या नजरेसमोर सगळ्यात पहिल्यांदा प्रसादच आला. प्रसादला दाढी, मिशी लावल्यास तो त्यांच्यासारखाच दिसेन असा मला विश्वास होता. पण तरीही सगळ्यांचे यावर एकमत होत नसल्याने आम्ही काही अभिनेत्यांचे ऑडिशन, लूक टेस्ट घेतले. पण कोणताही अभिनेता त्या भूमिकेसाठी योग्य वाटत नव्हता. प्रसादचे लूक टेस्ट घेतल्यावर प्रसादच योग्य आहे ही गोष्ट सगळ्यांनाच पटली आणि प्रसादचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसाद अनेक वर्षं अभिनय करत असूनही तो कोणत्याही इमेजमध्ये अडकलेला नाहीये. 
तू स्वतः एक दिग्दर्शक असताना ही मालिका दिग्दर्शित करण्याचा विचार का नाही केलास?
या मालिकेचे दिग्दर्शन करण्याची मला खूपच इच्छा होती. पण तू माझा सांगाती या मालिकेचे चित्रीकरण मी महिन्यातील 16-18 दिवस करतो. त्यातही गेल्या काही महिन्यांपासून आमचे आऊटडोर शूटिंग सुरू आहे. त्यामुळे या मालिकेला द्यायला माझ्याकडे वेळ नव्हता. 
तुकारामांची व्यक्तिरेखा गेली कित्येक वर्षं तू साकारत आहेस, या मालिकेसाठी प्रेक्षकांच्या कशाप्रकारच्या प्रतिक्रिया तुला मिळतात?
तुकारामांची व्यक्तिरेखा साकारणे कोणत्याच अभिनेत्यासाठी सोपे नाहीये. मला प्रेक्षकांनी या भूमिकेत स्वीकारले यासाठी मी खूपच आनंदी आहे. काही ठिकाणी तर मी तुकाराम आहे हे समजून लोक माझ्या पायादेखील पडतात. मी या वर्षी वारीला गेलो होतो. मी आळंदीला असताना मला पाहून यंदा वारीला तुकारामच आले आहेत असेच लोक म्हणायला लागले. या गोष्टीमुळे माझी इच्छा नसतानाही मला वारीतून लगेचच घरी परतावे लागले. 
तू आज दिग्दर्शक, अभिनेता, लेखक, निर्माता अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडत आहेस, तुला यामधील कोणती भूमिका सगळ्यात जास्त आवडते?
मी अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, लेखन सगळ्याच गोष्टी खूप एन्जॉय करतो. निर्माता हा सगळ्यात केविलवाणी प्राणी असतो असे मला वाटते. माझा निर्मात्यांविषयीचा आदर या मालिकेनंतर कित्येक पटीने वाढला आहे. निर्मात्याला कलाकार, लेखक, तंत्रज्ञ सगळ्यांनाच सांभाळावे लागते. निर्मात्याचे काम हे खूपच कठीण असते. लेखन करणे हेदेखील काही सोपे काम नाहीये. तुम्ही एखाद्या मालिकेचे लेखन करत असता तेव्हा सतत तीच मालिका, त्याच्या व्यक्तिरेखा, त्याचे कथानक तुमच्या डोक्यात सुरू असते. त्यामुळे घरी किंवा कोणत्या घरगुती समारंभात गेल्यासही माझे कधीच लक्ष नसते. मी माझ्या मालिकांचाच विचार करत असतो अशी नेहमीच माझ्या पत्नीची तक्रार असते. अभिनय करणे ही गोष्ट तर मी स्वतः खूप एन्जॉय करतो. पण तू माझा सांगाती ही मालिका संपल्यानंतर डेली सोप मालिकेत काही महिने तरी काम करायचे नाही असे मी ठरवले आहे. मला काही वेळ माझ्या कुटुंबीयांना आणि मुलांना द्यायचा आहे. मी गेली तीन वर्षं मालिका करत असल्याने मी म्हणावा तसा वेळ माझ्या मुलांना देऊ शकलेलो नाही.  
एक लेखक म्हणून तुला आजच्या मालिकांविषयी काय वाटते?
आपल्याला डेली सोपची सवय लागली आहे. त्यामुळे मालिका कितीही वाईट वळणावर जात असली प्रेक्षक ती पाहाणे सोडत नाही असे मला वाटते. डेली सोपमध्ये लेखकाला एकदा लिहिले की पुनर्विचार करायला वेळच मिळत नाही. आपण पाश्चिमात्य देशातील मालिकांसोबत आपल्या मालिकांची तुलना करतो. पण त्या मालिकांसाठी लेखकाला दिला जाणारा वेळ आणि मानधन हे आपल्यापेक्षा खूपच जास्त असते याचा आपण विचार करत नाही. तिथे एक व्यक्ती मालिका लिहित नसून अनेक जण एका मालिकेवर मेहनत घेत असतात. मालिकांच्याबाबतीत कलाकारापेक्षाही लेखक हा खरा हिरो असतो हा विचारच आपल्याकडे केला जात नाही. सिनेमा हे दिग्दर्शकाचे माध्यम असते तर मालिका हे लेखकाचे माध्यम असते. 
आजपर्यंत इतक्या भूमिका साकारल्यानंतर कोणती भूमिका साकारायची तुझी इच्छा आहे?
मी गेली अनेक वर्षं मालिका, चित्रपटांमध्ये, नाटकांत काम करत आहे. मी अभिनयक्षेत्रात आलो तेव्हा अभिनेता म्हणून मला कोणी काम देईल असे मला कधीच वाटले नव्हते. मी सगळ्यात पहिले फोटोशूट केले, तेव्हा मला खलनायकाच्या भूमिकाच मिळणार आहे असेच मला वाटले होते. पण आजपर्यंतच्या माझ्या कारकिर्दीत मी कधीच कोणती नकारात्मक भूमिका साकारलेली नाही. पण मला भविष्यात खलनायक साकारायला नक्कीच आवडेल. 


 

Web Title: The brakes are made!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.