मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी अभिनेत्रीचा दणदणीत विजय, ठाकरेंच्या उमेदवाराला चारली धूळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 18:46 IST2026-01-16T18:45:33+5:302026-01-16T18:46:27+5:30
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं ठाकरे सेनेच्या उमेदवाराचा पराभव करत राजकीय मैदानात आपली यशस्वी एन्ट्री घेतली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी अभिनेत्रीचा दणदणीत विजय, ठाकरेंच्या उमेदवाराला चारली धूळ!
मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल १५ जानेवारी रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर आज १६ जानेवारी रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या युतीने जोरदार मुसंडी मारली, तर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या शिवशक्तीची मोठी पिछेहाट झाल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या प्राथामिक कलानुसार, भाजपाने मुंबईत बहुतमाचा आकडा पार केला आहे. यामध्ये सर्वात लक्षवेधी विजय ठरला आहे तो म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशा परुळेकरचा. मराठी अभिनेत्रीनं भाजपच्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवला आहे.
कांदिवली पूर्व प्रभाग क्रमांक २५ मधील लढत अत्यंत हायव्होल्टेज ठरली. निशा परुळेकरसमोर ठाकरे सेनेच्या माधुरी भोईर यांचे मोठे आव्हान होते. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात युती झाली होती. या युतीच्या जागावाटपात वॉर्ड क्रमांक २५ हा भाजपच्या वाट्याला आला. भाजपने इथून निशा परुळेकर यांच्यावर विश्वास टाकला. पण, ही जागा सेनेला न मिळाल्याने स्थानिक शिवसेना नेते शेखर शेरे नाराज झाले. बंडखोरी करत त्यांनी थेट अपक्ष अर्ज दाखल करून निशा यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं. मात्र, मतदारांनी निशा परुळेकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडूण दिलंय.
केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर भाजपचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांची कट्टर समर्थक आणि कार्यकर्ती म्हणून निशा परुळेकरची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती पक्ष संघटनेत सक्रिय आहे. तिच्या लोकप्रियतेची आणि सामाजिक कामाची दखल घेत भाजपने निशाला उमेदवारी दिली होती.

कोण आहे निशा परुळेकर?
निशा परुळेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील एक ओळखीचे नाव आहे. भरत जाधव यांच्यासोबत 'सही रे सही' या लोकप्रिय नाटकात तिनंं काम केले आहे. 'काळुबाई पावली नवसाला', 'अशी होती संत सखू', 'सासूच्या घरात जावयाची वरात', 'पोलीस लाईन', 'हरी ओम विठ्ठला', 'तीन बायका फजिती ऐका' हे तिचे गाजलेले सिनेमे आहेत. तिची 'दख्खनचा राजा जोतिबा' या मालिकेत त्यांनी साकारलेली 'महालक्ष्मी अंबाबाई'ची भूमिका प्रचंड गाजली होती.