नात्यांचं भावविश्व सांगणारी बापलेकीची हळवी कहाणी, भूषण प्रधानच्या ‘तू माझा किनारा’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:45 IST2025-10-10T16:44:47+5:302025-10-10T16:45:18+5:30
भूषण प्रधान आणि केतकी नारायण यांच्या ‘तू माझा किनारा’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

नात्यांचं भावविश्व सांगणारी बापलेकीची हळवी कहाणी, भूषण प्रधानच्या ‘तू माझा किनारा’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
भूषण प्रधान आणि केतकी नारायण यांच्या ‘तू माझा किनारा’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरच्या पहिल्याच क्षणापासून घरातील नात्यांची नाजूक गुंफण जाणवते. खोल भावविश्वांमधून वाहणारी ही कथा केवळ एका नात्याची नाही, तर प्रत्येक कुटुंबाच्या हृदयाशी जोडणारी आहे.
भूषण प्रधान एका संवेदनशील, अंतर्मुख वडिलांच्या भूमिकेत तर केतकी नारायण एका समजूतदार आणि भावनिक आईच्या रूपात दिसते. या दोघांच्या अभिनयाला लहानग्या केया इंगळेचा निखळ निरागसपणा सुंदर परिपूर्णता देतो. सोबतच प्रणव रावराणे भूषण प्रधानच्या मित्राच्या भूमिकेत तर अरुण नलावडे वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सर्व कलाकारांच्या सहज आणि प्रभावी अभिनयाने ट्रेलरला वास्तवाची आणि ऊबदार भावनांची छटा मिळाली आहे.
ट्रेलरमधील दृश्यांमध्ये वास्तव जीवनाची छाया आहे. घरातील लहानसं जग, दैनंदिन क्षणांतील प्रेम आणि अव्यक्त वेदना. संवाद, संगीत आणि छायांकन या तिन्ही घटकांनी या कथेचा आत्मा अधिक जिवंत केला आहे. ‘तू माझा किनारा’ हा केवळ एका बापलेकीच्या नात्याचा प्रवास नाही, तर प्रत्येक कुटुंबाला स्वतःच्या आयुष्याचा आरसा दाखवणारा भावनिक अनुभव आहे.
या चित्रपटाची निर्मिती जॉइसी पॉल जॉय यांनी केली असून, सह-निर्माते सिबी जोसेफ आणि जॅकब जेव्हियर आहेत. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन क्रिस्टस स्टीफन यांचे असून, त्यांनी कुटुंबातील नात्यांच्या गुंतागुंतीला हळुवारपणे उलगडलं आहे. रूपांतरित पटकथा आणि संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. छायांकन एल्धो आयझॅक, संकलन सुबोध नारकर, आणि कला दिग्दर्शन अनिल केदार यांनी साकारले असून, त्यांच्या कार्यामुळे चित्रपटाला वास्तवाचा आणि संवेदनांचा सुंदर मेळ लाभला आहे.
काही कथा नुसत्या सांगायच्या नसतात, त्या अनुभवायच्या असतात. शब्दांपलीकडे जाऊन, भावनांच्या भाषेत उलगडणारी अशीच एक कथा ‘तू माझा किनारा’ सिनेमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. एका घरातल्या, एका कुटुंबातल्या नात्यांचा हा प्रवास वडील, आई आणि मुलगी यांच्या नात्यातून कुटुंबाच्या एकत्रतेचा आणि प्रेमाच्या गाभ्याचा शोध घेणारा आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणारा ‘तू माझा किनारा’ हा सिनेमा प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या घरातील, आपल्या माणसांतील नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहायला लावेल. कारण शेवटी, प्रत्येकाचं आयुष्य कुणाच्यातरी किनाऱ्याशी जोडलेलं असतंच.