बाबो..! ४०० साड्यांचं कपाट, एका साडीची किंमत 'किडनी' एवढी, पाहा गिरीजाचं स्पेशल कलेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:49 IST2025-12-10T12:43:18+5:302025-12-10T12:49:25+5:30
Girija Oak :गिरीजा ओकने हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत तिचा वॉर्डरॉब दाखवून त्यातील साड्यांचं कलेक्शन दाखवलं. या साड्यांची आठवण आणि किमतीबद्दलही सांगितलं.

बाबो..! ४०० साड्यांचं कपाट, एका साडीची किंमत 'किडनी' एवढी, पाहा गिरीजाचं स्पेशल कलेक्शन
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक 'नॅशनल क्रश' म्हणून प्रसिद्धीझोतात आली आहे. तिच्या लूकवर, हसण्यावर, बोलण्याच्या स्टाईलवर सगळेच भाळले आहेत. त्यामुळे ती सातत्याने चर्चेत येत असते. ती तिच्या साडीतल्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर रातोरात नॅशनल क्रश झालीय. दरम्यान आता तिने एका मुलाखतीत तिच्या वॉर्डरॉबमधील साड्यांचं कलेक्शन दाखवत त्याबद्दल सांगितलं.
गिरीजा ओकने हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत तिचा वॉर्डरॉब दाखवून त्यातील साड्यांचं कलेक्शन दाखवलं. या साड्यांची आठवण आणि किमतीबद्दलही सांगितलं. तिच्याकडे १००-२०० नाही तर ४०० साड्या आहेत आणि त्याच्या किमती लाखोंच्या घरात आहेत. तर काही साड्या तर ५० वर्षे जुन्या आहेत. गिरजाने सांगितले की, "माझ्याकडे ४०० साड्या आहेत. आई आणि आजीकडून मला साड्यांचा हा अनमोल संग्रह मिळाला आहे. माझ्या कलेक्शनमधील प्रत्येक साडी महाग आणि खास आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील, वेगवेगळ्या परंपरांशी जोडलेल्या साड्या माझ्याजवळ आहेत."
यावेळी गिरजाने तिच्या आजीची ६०-७० वर्षांपूर्वीची एक विशेष साडी दाखवली. ही क्रीम रंगाची साडी हाताने रंगवलेली शिफॉनची होती. तिने तिच्या आवडत्या बनारसी जमावर साडीबद्दलही आवर्जून सांगितले. एक साडी दाखवताना तिने एक धक्कादायक खुलासा केला. ती म्हणाली की, "ही माझी सर्वांत आवडती साडी आहे. ही थोडी महाग आहे. अक्षरशः काही किडन्यांच्या किंमतीइतकी (काही लाखांमध्ये) याची किंमत आहे. माझ्याकडे 'रॉ मँगो' ब्रँडची एकच बनारसी जमावर साडी आहे. मला अशा आणखी साड्या घेणं परवडणारे नाही; पण हा रंग खूप सुंदर आहे."
गिरजाच्या मते, जर साड्यांची व्यवस्थित काळजी घेतली, तर त्या वर्षानुवर्षे टिकतात. तिने लेहेरिया, ब्लॉक-प्रिंटेड, कलमकारी साड्या आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन पैठणी अशा अनेक साड्यांचे कलेक्शन दाखवले. तिने गुजरातमधून खरेदी केलेली जॉर्जेट लेहेरिया साडी दाखवली, जी एका छोट्या बॉक्समध्ये बसली होती. तसेच, त्यांनी स्वतः ब्लॉक प्रिंट केलेली एक साडीसुद्धा संग्रहात दाखवली. गिरीजाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती थेरपी शेरपी या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.