बॉक्स ऑफिसवर 'आता थांबायचं नाय'! दोन दिवसात भरत-सिद्धार्थ जाधवच्या सिनेमाने कमावले इतके पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 11:50 IST2025-05-03T11:49:35+5:302025-05-03T11:50:03+5:30
'आता थांबायचं नाय' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा असून दोनच दिवसांमध्ये या सिनेमाने चांगली कमाई केलीय. याशिवाय प्रेक्षकांचाही सिनेमाला हाउसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे

बॉक्स ऑफिसवर 'आता थांबायचं नाय'! दोन दिवसात भरत-सिद्धार्थ जाधवच्या सिनेमाने कमावले इतके पैसे
१ मे रोजी महाराष्ट्रदिनाच्या मुहुर्तावर मराठी सिनेसृष्टीत एकाच दिवशी दोन सिनेमे रिलीज झाले. 'आता थांबायचं नाय' आणि 'गुलकंद'. या दोन्ही सिनेमांची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. 'आता थांबायचं नाय' हा सिनेमा सफाई कामगारांच्या जीवनातील सत्य घटनेवर आधारीत होता. या सिनेमात भरत जाधव, आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. दोन दिवसांमध्ये 'आता थांबायचं नाय' सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केलेली दिसली. जाणून घ्या.
'आता थांबायचं नाय' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर डंका
भरत जाधव, आशुतोष गोवारीकर, ओम भूतकर, सिद्धार्थ जाधव, पर्ण पेठे, प्राजक्ता हनमघर या दिग्गज कलाकारांची भूमिका असलेला 'आता थांबायचं नाय' सिनेमाने दोन दिवसात बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. दोनच दिवसात या सिनेमाने ५० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. sacnilk च्या रिपोर्टनुसार पहिल्या दिवशी 'आता थांबायचं नाय' सिनेमाने ४५ लाख तर दुसऱ्या दिवशी १४ लाखांची कमाई केली आहे. त्यामुळे दोन दिवसात 'आता थांबायचं नाय' सिनेमाने ५९ लाख रुपये कमावले आहेत. शनिवार-रविवारी वीकेंडला हा सिनेमा अजून चांगली कमाई करेल, अशी आशा ठेवायला हरकत नाही.
'आता थांबायचं नाय' सिनेमाविषयी
झी स्टुडिओज् प्रस्तुत , झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले,अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केले आहे. गुलराज सिंग यांचं धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी व धरम वालिया यांनी केली आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव प्रोड्यूसर आहेत.
या चित्रपटात भरत जाधव यांच्यासह आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीणकुमार डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, श्रीकांत यादव आणि रोहिणी हट्टंगडी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.