अशोक सराफ झळकणार सेंटिमेंटलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 15:40 IST2017-04-12T10:10:23+5:302017-04-12T15:40:23+5:30
अशोक सराफ हे मराठी इंडस्ट्रीतील एक महत्त्वाचे नाव मानले जाते. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठीच नव्हे तर हिंदी इंडस्ट्रीमध्येदेखील त्यांची ...
.jpg)
अशोक सराफ झळकणार सेंटिमेंटलमध्ये
अ ोक सराफ हे मराठी इंडस्ट्रीतील एक महत्त्वाचे नाव मानले जाते. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठीच नव्हे तर हिंदी इंडस्ट्रीमध्येदेखील त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अशी ही बनवा बनवी, आयत्या घरात घरोबा, नवरी मिळे नवऱ्याला यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटातही ते अनेक चांगल्या भूमिकेत झळकले आहेत. यस बॉ़स, करण अर्जुन, सिंघम यांसारख्या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. यासोबतच त्यांनी एकेकाळी छोटा पडदादेखील गाजवला होता. त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या हम पाच या मालिकेला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. पण गेल्या काही वर्षांपासून ते खूपच कमी मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. ते सध्या त्यांची भूमिका अतिशय चोखंदळपणे निवडत आहेत. एखादी भूमिका अतिशय आवडल्याशिवाय करायचीच नाही असेच त्यांनी ठरवले आहे. पण आता अशोक सराफ अनेक वर्षांनंतर प्रेक्षकांना एका चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. पोस्टर गर्ल, पोस्टर बॉइज यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले होते. समीर पाटील पोलिसांच्या आयुष्यावर सेंटिमेंटल नावाचा चित्रपट बनवत असून या चित्रपटात अशोक सराफ महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात ते पोलिसांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची कथा त्यांना अतिशय आवडल्यामुळे त्यांनी या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत उपेंद्र लिमयेदेखील काम करत आहे. सेंटिमेंटल या चित्रपटात मुंबई पोलिसांच्या मानसिकतेवर कॉमेडीच्या अंगाने भाष्य केले जाणार आहे.