"मोलकरणीची मुलं ही माणसं नाहीत का?", चिन्मयी सुमीतनं मराठी शाळेच्या मुद्द्यावर केलेलं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 09:13 PM2024-02-27T21:13:14+5:302024-02-27T21:14:45+5:30

Chinmayee Sumit : मराठमोळी अभिनेत्री चिन्मयी सुमीत बऱ्याचदा मराठी शाळांबद्दल आपलं मत व्यक्त करत असते. दरम्यान आता मराठी भाषा दिनानिमित्त हॉनेस्ट बोल्ड ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा मराठी शाळांवर भाष्य केले आहे.

"Aren't the children of maids human beings?", Chinmayee Sumeet's statement on the issue of Marathi school in discussion | "मोलकरणीची मुलं ही माणसं नाहीत का?", चिन्मयी सुमीतनं मराठी शाळेच्या मुद्द्यावर केलेलं वक्तव्य चर्चेत

"मोलकरणीची मुलं ही माणसं नाहीत का?", चिन्मयी सुमीतनं मराठी शाळेच्या मुद्द्यावर केलेलं वक्तव्य चर्चेत

मराठमोळी अभिनेत्री चिन्मयी सुमीत बऱ्याचदा मराठी शाळांबद्दल आपलं मत व्यक्त करत असते. दरम्यान आता मराठी भाषा दिनानिमित्त हॉनेस्ट बोल्ड ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा मराठी शाळांवर भाष्य केले आहे. यात मराठी शाळेत मोलकरणींची मुलं शिकतात.. ती 'मुलं' नाहीत का? असे रोखठोक मत व्यक्त केले आहे. या मुलाखतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

चिन्मयी सुमीतने मुलाखतीत सांगितले की, जेव्हा मराठी शाळेमध्ये माझी मुलं घालणार असं मी म्हटलं होतं. तेव्हा माझ्या शेजारी ज्या वहिनी आहेत. त्यांना मी वहिनीच म्हणायचे आणि त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. त्या मला म्हणत होत्या, कुठल्या शाळेत घालतेयंस तू मुलांना? तुला काही कठीण आहे का,  पार्ले टिळक इंग्लिश माध्यमात प्रवेश मिळणं. मी घेऊन देते मुलांना अॅडमिशन. तर मी त्यांना म्हटलं, अहो प्रश्न अॅडमिशन न मिळण्याचा नाहीच आहे वहिनी, पण मला मराठी शाळेतच मुलांना घालायचंय. सगळी मोलकरणींची मुलं येतात त्या शाळेमध्ये, तर मी म्हटलं, ती माणसं नाहीत? मोलकरणींची मुलं ही माणसं नाहीत? आणि कदाचित असं होईल की, माझी मुलं जी भाषा बोलतात ती मुलं ती भाषा शिकतील. त्या मुलांची भाषा माझी मुलं शिकतील. ही अशी सरमिसळ व्हायलाच हवी.

ती पुढे म्हणाली की, आपला मुळात समाजच हा सगळ्या घटकांनी बनलेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये वेगळे वर्ग आहेत. ते जे वर्ग आहेत ते आपण आता कशाच्या दृष्टीकोनातून बघतो एक सधनता या दृष्टीकोनातून बघतो आपण की मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, पण मध्यम वर्गामध्ये सुद्धा आता तीन पातळ्या झाल्यात. अशा पद्धतीचं आपलं वातावरण आहे. तुम्ही जे म्हणताय की, त्यांना इथे संगत चांगली मिळणार नाही. तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे की, इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाऊन त्यांना संगत चांगली मिळणार आहे? संगत म्हणजे काय असतं शेवटी? की ते कुठल्या वर्गातून येतात असं जर असेल तर तिथे तुम्हाला लढा द्यायला लागणार नाहीये? तिकडची मुलं जी येतील ती त्यांच्या स्कोडा, मर्सिडीजमधून येतील. त्यांच्या वाढदिवसांच्या पार्ट्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये असतील. त्यावेळेला सुद्धा तुम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांच्या वाढदिवसाची पार्टी करताना तुम्हाला तुमचे सगळे रिसोर्स गोळा करुन तुम्हाला ते करत रहायला पाहिजे, कारण तसं तुम्ही केलं नाहीत तर तुमच्या मुलाच्या मनामध्ये न्यूनगंड येऊ शकतो. आणि काय मला तर इतकं अद्भूत वाटतं, माझ्या मोलकरणीची मुलं माझ्या मुलांच्या बरोबर शिकत असतील. 

म्हणून ती बाई कष्ट करतेय
चिन्मयी सुमितने सांगितले की, मी घरात बसलीये माझ्या मुलांना वाढवण्यासाठी म्हणून ती बाई कष्ट करतेय त्याच्यानंतर ती त्या मुलाला शाळेत सोडते. त्याच्यानंतर पालक सभा अटेंड करते. त्या मुलाचे जे काय सो कॉल्ड प्रोजेक्ट असतील छोटे मोठे कार्यानुभव असतील ते करायला धडपडतेय. तर अशा जिला म्हणजे अशा वर्गातील बाई आणि असा मुलगा जो बघतोय आपल्या आईला की ती माझ्या उत्कर्षासाठी कष्ट करतेय असा संस्कार जर माझ्या मुलाला मिळणार असेल तर तो उत्तम संस्कार आहे. त्याला मिळू देत तो संस्कार. ती मुलं असं काही नसतंच एकतर. तुम्ही द्या ना संगत ती तुमच्या मुलांना जी संगत हवी आहे ती तुम्ही छान द्या आणि तुमच्या मुलांच्या माध्यमातून त्या मुलांची संगत चांगली होऊ द्या. तुम्ही या शाळांमध्ये तुमच्या मुलांना घालाल. आयबी स्कूलमध्ये ती मुलं हा संस्कार घेऊन येतील की, आपण जास्तीत जास्त मिळवत राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी सगळे कष्ट घेतले पाहिजेत. सगळ्या मार्गांनी ते मिळवलं पाहिजे. मग त्या वेळेला ते कुठल्याही मार्गाने नाही बरं का मिळवायचं, चांगल्याच मार्गाने मिळवायचं. हा एक्स्ट्रा संस्कार तुम्हाला देत राहावा लागणार आहे घरातून.     

Web Title: "Aren't the children of maids human beings?", Chinmayee Sumeet's statement on the issue of Marathi school in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.