"गेल्या काही दिवसात मराठी सिनेसृष्टीत नैराश्याचं वातावरण होतं, पण हा सिनेमा..."; अंकुश चौधरीकडून 'आता थांबायचं नाय'चं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 09:25 IST2025-05-03T09:25:29+5:302025-05-03T09:25:50+5:30
अंकुश चौधरीने ‘आता थांबायच नाय’ सिनेमा पाहून सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिली आहे. अंकुशने सिनेमाचं कौतुक केलं असून सर्वांना सिनेमा पाहण्याचा आवाहन केलंय. काय म्हणाला अंकुश, जाणून घ्या

"गेल्या काही दिवसात मराठी सिनेसृष्टीत नैराश्याचं वातावरण होतं, पण हा सिनेमा..."; अंकुश चौधरीकडून 'आता थांबायचं नाय'चं कौतुक
अंकुश चौधरी कायमच मराठी सिनेसृष्टीतील नवनवीन सिनेमांना प्रोत्साहन देत असतो. नुकतंच अंकुशने सोशल मीडियावर ‘आता थांबायच नाय’ सिनेमाचं कौतुक करणारी खास पोस्ट शेअर केली आहे. अंकुश लिहितो की, "‘आता थांबायच नाय’ ह्या सिनेमाच्या पब्लिकने खूप कमाल काम उभं केलं आहे. सिनेमा कुटुंबा सोबत थिएटर मध्ये जाऊन बघा, मी ह्या सिनेमाच्या प्रीमियरला गेलो होतो, बऱ्यापैकी सगळी सिनेमा सृष्टी हा सिनेमा आवर्जून पाहायला आली होती.
"थिएटर इतके तुडूंब भरले होते की बऱ्याच मंडळींनी पायरीवर बसून हा चित्रपट पाहावा लागला अस असतानाही शेवटपर्यंत हा सिनेमा पाहताना कुणीही जागेवरून हलले नाही. सिनेमाची गोष्ट ही मुंबई महानगर पालिकेत घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट म्हणजे सर्व सफाई कामगारांना आणि त्यांच्या कार्याला दिलेला कडकडीत सलाम आहे. ‘आता थांबायच नाय’ हा सिनेमा मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक नवा आशेचा किरण ठरेलं ह्यात काही शंका नाही. नव्या दमाच्या तरुण दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ मंडळीसाठी हा चित्रपट बरीच दार उघडी करणार आहे."
"दिग्दर्शक शिवराज वायचळच्या ह्या प्रयत्नाला प्रेक्षक डोक्यावर घेतीलच. पण आपण सर्व सिनेमा करणाऱ्या लोकांनी देखील ह्या नव्या दमाच्या पिढीचे कौतुक करायला हवं. मराठी सिनेमा आता पुन्हा कात टाकतो आहे आणि पुन्हा तरुण होतो आहे ह्याचा खूप आनंद आहे. गेल्या काही दिवसात मराठी चित्रपट सृष्टीत नैराश्याच वातावरण होतं पण हा सिनेमा नैराश्याची धूळ बाजूला सारून मराठी प्रेक्षकाला मराठी सिनेमाचं खूळ पुन्हा लावेल. ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाच्या संपुर्ण टीमचे मनापासून कौतुक. तेव्हा जिथे आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तिथल्या थिएटर मध्ये जावून हा सिनेमा नक्की पाहा!"