'बंदिनी', 'हॅलो इन्सपेक्टर' मालिकेचे लेखक अनिल मधुसूदन कालेलकर यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:15 IST2025-12-11T18:14:47+5:302025-12-11T18:15:52+5:30
Anil Madhusudan Kalelkar Passes Away : 'बंदिनी', 'हॅलो इन्सपेक्टर' मालिकेचे लेखक अनिल मधुसूदन कालेलकर यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.

'बंदिनी', 'हॅलो इन्सपेक्टर' मालिकेचे लेखक अनिल मधुसूदन कालेलकर यांचं निधन
'बंदिनी', 'हॅलो इन्सपेक्टर' मालिकेचे लेखक अनिल मधुसूदन कालेलकर यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. आज ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता मुंबईतील लीलावती रुग्णालयात अल्पशा आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
अनिल मधुसूदन कालेलकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९४७ रोजी बांद्रा येथे झाला. प्राथमिक शिक्षण दादरमधील छबीलदास हायस्कूलमध्ये झाले. तर पुढील शिक्षण वांद्रे येथील नॅशनल कॉलेजमध्ये झाले. ते अविवाहित होते. अनिल कालेलकर यांनी आपली भाची गौरी कालेलकर चौधरीसोबत 'मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन'ची स्थापना केली. अनिल कालेलकर हे अनेक वर्ष बांद्रा येथील साहित्य सहवालमध्ये वास्तव्याला होते.
अनिल कालेलकर यांचे लेखनकार्य अत्यंत बहुआयामी आणि अपूर्व असे होते. त्यांनी २५ हून जास्त हिंदी, मराठी आणि गुजराती चित्रपटांचे लेखन केले आहे. तसेच २५ पेक्षा अधिक हिंदी, मराठी, गुजराती मालिकांचंही लेखन केले आहे. अनिल कालेलकर यांनी १७ मालिकांचे सलग लेखन केलं आहे. दूरदर्शन क्षेत्रातील एक दुर्लक्ष आणि अभूतपूर्व विक्रम त्यांच्या नावे आहे. अनिल कालेलकर यांच्या हिंदी व मराठी मिळून १२ सस्पेन्स, थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक विविध विषयांवर लेखन केलं आहे आणि प्रत्येक विषयावर प्रभावी मांडणी केली आहे. 'बंदिनी','परमवीर','हॅलो इन्सपेक्टर' या तिन्ही मालिकांना लागोपाठ तीन वर्षे सर्वोत्कृष्ट मालिकेचे पारितोषिक मिळाले आहे. अनिल कालेलकर यांनी मांडलेले विषय, कथा आणि आशय आज अनेक चॅनल्स ज्याप्रकारे स्वीकारतात. त्या संकल्पना त्यांनी अनेक दशकांपूर्वीच आपल्या लेखणीतून साकारल्या होत्या.