"३ वर्ष काम बंद, नवीन घराचा हफ्ता द्यायला पैसे नव्हते, त्यावेळी..."; अमृता खानविलकरने सांगितला स्वामी समर्थांचा विलक्षण अनुभव
By देवेंद्र जाधव | Updated: January 10, 2026 15:09 IST2026-01-10T15:07:06+5:302026-01-10T15:09:09+5:30
अमृता खानविलकरच्या आयुष्यात हा विलक्षण प्रसंग घडला आहे. स्वामी समर्थांनी तिच्या आयुष्यात विलक्षण बदल कसा घडवून आणला, याचा खास किस्सा तिने सांगितला आहे. नक्की वाचा

"३ वर्ष काम बंद, नवीन घराचा हफ्ता द्यायला पैसे नव्हते, त्यावेळी..."; अमृता खानविलकरने सांगितला स्वामी समर्थांचा विलक्षण अनुभव
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत नाव कमावणारी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर स्वामी समर्थांची मोठी भक्त आहे. अमृताने विविध मुलाखतींमध्ये स्वामी समर्थांच्या भक्तीचा तिला आलेला अनुभव सांगितला आहे. अमृताने नुकतीच अमुक तमुक चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी अमृताने स्वामी समर्थांच्या चमत्काराचा विलक्षण अनुभव सांगितला आहे. जो वाचून तुम्हीही थक्क व्हाल.
अमृता सांगते, ''मी आणि हिमांशू आमचं एक लोखंडवाला इथे घर आहे. आम्ही ते घर घेतलं आणि कोविड हिट झाला. त्या घराचा EMI खूप जास्त होता. हे परवडत नाहीये आम्हाला, असं झालं होतं. मग आम्ही ठरवलं हे घर भाड्यावर देऊया. कारण कोणी विकत पण घेत नव्हतं. कोणी येतच नव्हतं. आम्ही जे सेव्हिंग केले होते त्याचाही तळ आला होता. पुढच्या मनात द्यायला काहीच पैसे नव्हते. कारण ३ वर्ष काम बंद होतं.''
''शेवटी मग एक पार्टी आली. ते फक्त माझं मंदिर बघून गेले. ते म्हणाले, ठीकेय आपण उद्या पेपर साईन करु. आमच्याकडे पुढच्या महिन्याचा हफ्ता द्यायला नव्हता. आम्ही त्यांना जस्ट विचारलं की, तुम्ही का म्हणून हे घर निवडलंत. तेव्हा पेपर साईन करताना तो माणूस मला म्हणाला, तुमच्या इथे स्वामी समर्थांचा फोटो आहे ना मंदिरात, ते बघून मी घर घेतलं. मी त्यांना खूप मानतो. म्हणून मी हे घर घेतलं. मी त्यावेळी इतकी ढसाढसा रडले.''
''आता हे काय आहे. माझ्याबरोबर घडलेला हा किस्सा आहे. मी तिथे बसल्या बसल्या स्वामींना सॉरी म्हणाले. की सॉरी, मला वाटलं तुमचं लक्ष नाहीये माझ्याकडे. आणि तुम्ही हे घडवलंत. आय अॅम सॉरी. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. कारण आमच्याकडे पैसे नव्हते. पुढच्या महिन्याचा हफ्ता थकला असता. मग ते बँक आणि इतर अडचणी आल्या असत्या. ते कपल पुढचे ३ वर्ष राहिलं. आम्हाला त्या घराचा फार काही त्रास झाला नाही.'', असा किस्सा अमृताने सांगितला.