Alka Kubal : अलका कुबल कायमची व्हिलचेअरवर राहणार..., अपघातानंतर अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, म्हणाली - "मी खूप खचले होते"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 16:21 IST2025-05-05T16:21:18+5:302025-05-05T16:21:43+5:30
Alka Kubal : अभिनेत्री अलका कुबल यांचा २००७ साली झालेल्या अपघातानंतर आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले

Alka Kubal : अलका कुबल कायमची व्हिलचेअरवर राहणार..., अपघातानंतर अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, म्हणाली - "मी खूप खचले होते"
अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अलका कुबल यांनी आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. त्यांना खरी ओळख माहेरची साडी सिनेमातून मिळाली. या चित्रपटानंतर एक सोशिक स्त्री अशी त्यांची ओळख प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. २००७ साली त्यांचा एक मोठा अपघात झाला होता. त्यानंतर त्या कधीच व्हिलचेअरवरुन उठूच शकणार नाही, अशी सिनेवर्तुळात रंगली होती. त्यावेळी त्यांना आलेला अनुभव एका मुलाखतीत शेअर केला.
अलका कुबल यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत कोल्हापूरवरून शूटिंग करून मुंबईत परतत असताना झालेल्या अपघातानंतर आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, २००७ साली माझ्याकडे ६ चित्रपट होते आणि तेव्हा अपघात झाला. डॉक्टर रामाणे म्हणाले अलका तू शूटला जाऊ शकत नाही. कारण माझ्या मणक्यात अर्ध्या इंचाची गॅप राहिली होती आणि ती ब्रेक झाली असती तर सगळ्या मणक्यांची साखळी तुटली असती. उद्या तुझी सर्जरी करायलाच पाहिजे. तोपर्यंत लक्षात आलं नाही खरंतर. मी एक्स रे काढत बसले. एमआरआय कधी काढलाच नाही. त्यामुळे त्याचा त्रास झाला. त्यांनी लिलावतीला ऑपरेशन केलं आणि प्लेट टाकली अन् मला उभे केले. म्हणाले उद्यापासून २-३ महिने तू शूटिंग अजिबात करू शकत नाही. सिनेमे पाठोपाठ होते. इंडस्ट्रीत पसरलं की अलका कुबल आता कायमची व्हिलचेअरवर राहणार. ते सहन करणं कठीण गेलं. बरेच जण आले की अलका ताई आम्ही दुसऱ्या कुणालातरी घेऊन सुरू करतो. आम्ही एवढे दिवस थांबू शकत नाही आणि त्यावेळी साइनिंग अमाउंट २५-५० हजार होत्या. तेही घेऊन गेले. म्हटलं काय ही इंडस्ट्री आहे. हे पण पाहिलं.
''तेव्हा खूप खचले होते''
अलका कुबल पुढे म्हणाल्या की, त्यावेळी माझ्या कुटुंबाने मला खूप सपोर्ट केला. मी खूप खचले होते. वजनही ११० किलो पर्यंत गेलं होतं आणि ते कमी करायला मी चालायला जायचे. तेव्हा बाकीचे बघून म्हणायचे, काय तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करता. किती वजन वाढलंय, तुम्हाला काही वाटत नाही का? मी ते भोगलंय. डोळ्यात पाणी यायचं पण शांत राहायचे. असं वाटायचं काय लोक असतात. तुम्हाला ऐकवतात.