अजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 19:01 IST2018-11-21T19:00:56+5:302018-11-21T19:01:51+5:30
प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल 'माऊली' या रितेश देशमुख निर्मित आगामी मराठी चित्रपटात झळकताना दिसणार आहेत.

अजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान
अनेक हिंदी अभिनेत्यांना रुपेरी पडद्यावर आपल्या सूरांच्या तालावर थिरकायला लावणारी प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल आता 'माऊली' या रितेश देशमुख निर्मित आगामी मराठी चित्रपटात झळकताना दिसणार आहेत.
रितेश देशमुख यांच्या विनंतीचा मान राखून अजय-अतुल या संगीतकार बंधूंनी 'माझी पंढरीची माय' या गाण्यात दिसणार आहेत. या चित्रपटाच्या या गाण्याचे शूटिंग सुरु असतानाच रितेश देशमुख यांनी अजय-अतुल आणि चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री सैय्यमी खेर यांच्यासह एक खास प्रचारात्मक व्हिडिओ शूट केला आहे.
याबाबत रितेश देशमुख म्हणाला की, अजय-अतुल या संगीतकार जोडीस मी या भक्तिपूर्ण गाण्याचे संपूर्ण संक्षिप्त स्वरूप दिले होते आणि त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या संगीत रचनांनी आश्चर्यचकित करून सोडले. मी त्यांना दिलेल्या गाण्याच्या संक्षिप्त माहितीच्या अगदी उलट असे गाणे त्यांनी माझ्यासमोर प्रस्तुत केले. खरंतर त्यांच्या संगीत रचनेने आमच्या चित्रपटाच्या पटकथेचा आढावा घेतला व चित्रपटाच्या चांगल्यासाठीच त्यात बदल केले.
'माझी पंढरीची माय' या गाण्याद्वारे रुपेरी पडद्यावरील पदार्पणाबद्दल सांगताना अजय गोगावले म्हणतात की, "या व्हिडिओत आम्ही असावे, ही रितेशची इच्छा होती." तर अतुल गोगावले सांगतात की, "रितेशने आम्हाला गाणी तयार करण्यास संपूर्ण स्वातंत्र्य दिले. सैराट चित्रपटा नंतर आता पुन्हा 'माऊली' या मराठी चित्रपटासाठी काम करताना आम्हाला खूप आनंद झाला.
'माझी पंढरीची माय' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.