"मी खूप रडले, त्यावेळी त्याने धीर दिला...", लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीत रेणुका शहाणेंचे डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:09 IST2025-11-17T13:06:40+5:302025-11-17T13:09:44+5:30
“मी तेव्हा रडत-रडत नाचले…”, रेणुका शहाणेंना सेटवर लक्ष्मीकांत बेर्डेंनी 'असा' दिलेला धीर, शेअर केली भावुक आठवण

"मी खूप रडले, त्यावेळी त्याने धीर दिला...", लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीत रेणुका शहाणेंचे डोळे पाणावले
Renuka Shahane: मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपल्या सहज सुंदर अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री रेणुका शहाणे. बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवाय 'सर्कस' या टीव्ही मालिकेतील त्यांची भूमिकादेखील मोठी गाजली. अशातच नुकतीच त्यांनी एका मुलाखतीत एक सुंदर पण हळवी आठवण शेअर केली, त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. यामध्ये बोलताना दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींनी डोळे पाणावले.
नुकतीच रेणुका शहाणे यांनी 'आरपार' या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंसोबतच्या आठवणी शेअर केल्या. रेणुका शहाणेंनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्याच मराठी सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत हाच सुनबाईचा भाऊ चित्रपटात स्क्रिन शेअर केली होती. त्या चित्रपटाच्या आठवणी शेअर करताना त्या म्हणाल्या, “माझा पहिला मराठी चित्रपट लक्ष्याबरोबर होता. मी पहिल्यांदाच कॉमेडी करत होते, आणि तो त्या काळात सुपरस्टार! मी बुजलेली, घाबरलेली… पण लक्ष्याने मला इतकं सांभाळून घेतलं की मी रिलॅक्स झाले.”
खऱ्या अर्थाने भावनिक क्षण तेव्हा आला, जेव्हा एका गाण्याच्या शूट दरम्यान नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार हे सगळ्यांसमोर रागावले होते. त्यानंतर रेणुका म्हणाल्या, “घरी कधीच कोणी एवढं ओरडलं नव्हतं… मी थेट रडायला लागले. तेव्हा लक्ष्या माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘रडत-रडत नाच! तुझ्या एनर्जीमुळे शॉट उत्तम दिसेल.’ मी रडत-रडत तो टेक दिला… आणि सुबल दादांनी कौतुकही केलं.” यानंतर लक्ष्मीकांत जवळ येऊन त्यांना म्हणाले, “अगं, ज्या नायिकांवर आजपर्यंत सुबल दादा रागावलेत त्या सगळ्या आज फार मोठ्या हिरोईन झाल्यात… त्यामुळे तुला आधीच अभिनंदन!” त्याच्या या शब्दांनी माझा आत्मविश्वास आणखी वाढला असं रेणुका यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं.
'हम आपके है कौन’च्या सेटवरचा किस्सा सांगत म्हणाल्या...
पुढे रेणुका आणि लक्ष्मीकांत बेर्डे हम आपके है कौन चित्रपटातही एकत्र दिसले. त्यावेळी लक्ष्मीकांतने मला खूप सपोर्ट केला,असंही त्या म्हणाल्या. त्या सिनेमाच्या आठवणी शेअर करताना त्यांनी सांगितलं,"‘हम आपके है कौन’च्या सेटवरही रिमा ताई माहीत होत्या, पण लक्ष्याबरोबर आधीचा एक्स्पीरियन्स असल्याने तो नेहमी जवळचा वाटायचा. तो मला नेहमी प्रत्येक गोष्टीत सामावून घ्यायचा.” लक्ष्मीकांत बेर्डेचं मोठेपण फक्त पडद्यावर नव्हतं तर ते सहकलाकारांना माणूस म्हणून कसा जपायचे, याची प्रचिती रेणुका यांच्या सांगण्यातून येते.