"हा चित्रपट म्हणजे वारी घडवणारा अनुभव..."; 'अभंग तुकाराम' पाहून अश्विनी महांगडेने सांगितला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:04 IST2025-11-08T14:48:28+5:302025-11-08T15:04:03+5:30
'अभंग तुकाराम' सिनेमा पाहून अश्विनी महांगडेने तिचा खास अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा सिनेमा पाहणं का महत्वाचं आहे, हे तिने सांगितलं आहे

"हा चित्रपट म्हणजे वारी घडवणारा अनुभव..."; 'अभंग तुकाराम' पाहून अश्विनी महांगडेने सांगितला अनुभव
अभिनेत्री अश्विनी महांगडेने 'अभंग तुकाराम' चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहून अश्विनी भारवली आहे. तिने सोशल मीडियावर हा चित्रपट पाहून सविस्तर अनुभव सांगितला आहे. अश्विनी लिहिते की, ''हा चित्रपट म्हणजे एक वारी घडवणारा अनुभव. खरे तर जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे बरेच अभंग आपण ऐकलेले आहेत पण त्यांचा अर्थ तितक्याच सात्विक पद्धतीने समजून सांगायचे शिवधनुष्य या चित्रपटाने पेलला आहे असे म्हणायला हरकत नाही.''
''वारी, वारकरी संप्रदाय, अभंग, संत हे सगळेच कायम मला माझ्या बालपणी घेवून जातात जिथे हे सगळे संस्कार करणारी माणसं आज माझ्या आजूबाजूला नसली तरी त्यांचे अस्तित्व जाणवू लागते. म्हणून हा चित्रपट माझ्या जवळचा वाटला. दिग्पाल सर तुमच्या सगळ्या चित्रपटांची यादी पाहता आम्हाला शिवरायांच्या स्वरूपात म्हणा, मावळ्यांच्या स्वरूपात म्हणा किंवा संतांच्या स्वरूपात म्हणा कायम आमच्या विचारांना दिशा देण्याचे काम केले आहे आणि या पुढच्या चित्रपटातही हे अजून पक्के होणार याची खात्री आहे.''
''अवधूत गांधी दादांच्या आवाजात आपलेपणा वाटतो आणि त्याचे सगळे अभंग, गाणी ऐकत माझा कायम मुंबई ते पसरणीचा प्रवास सुखकर होतो. स्मिता शेवाळे ताई काहीच हातात न ठेवता तू या व्यक्तिरेखेसाठी सगळे काही देऊन टाकलेस. या शूटसाठी नुपुरचा प्रवास ऐकून मला तिचा अभिमान वाटला. plz सगळ्यांना तू सांगावेस असे मला वाटते आणि लवकर त्या संदर्भात तुझी पोस्ट वाचायला आवडेल.''
''योगेश सोमण, तुमच्या लेखणीतून उतरलेला प्रवास आणि तुमच्या अभिनयातून उलगडलेला प्रवास यातून नवीन पिढीत अभंग अधिक रुजेल हे नक्की. अजिंक्य राऊत, महाराजांची व्यक्तिरेखा तीही अनेक लोकांनी सादर केलेली असताना आपण एक वेगळी छाप सोडून जाणे हे उत्तम जमले. पाणीदार डोळे, आदर आणि महाराज सगळेच कसे मुजरा करायला भाग पडणारे. अभंग तुकाराम या कलाकृतीसाठी केलेली मेहनत अप्रतिम.''