'नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं'; श्रेयसच्या Nine Rãsã निर्मितीमागील गोष्ट
By शर्वरी जोशी | Updated: October 5, 2021 18:03 IST2021-10-05T18:02:38+5:302021-10-05T18:03:17+5:30
Shreyas talpade: कोविडमुळे (Coronavirus) ओढावलेल्या संकटामुळे अनेक थिएटर आर्टिस्ट, पडद्यामागील कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

'नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं'; श्रेयसच्या Nine Rãsã निर्मितीमागील गोष्ट
मागील दोन वर्षांमध्ये प्रत्येक क्षेत्रात कमालीचा बदल झाला आहे. यात कलाविश्वदेखील वेगळं नाही. कलाविश्वातही अनेक अनपेक्षित बदल घडून आले. कोविडमुळे (Coronavirus) ओढावलेल्या संकटामुळे अनेक थिएटर आर्टिस्ट, पडद्यामागील कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आली. इतकंच नाही तर अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मची निवड केली. मात्र, या सगळ्यामध्ये नाटक कुठे तरी मागे पडताना पाहायला मिळालं. चित्रपटगृह, नाट्यगृह बंद असल्यामुळे अनेक नाटकांचे प्रयोग बंद झाले. त्यामुळेच अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) खास नाटक आणि परफॉर्मिंग आर्टसाठी एक नवा ओटीटी प्लॅटफॉर्म सादर केला. नाईन रसा (Nine Rasa) असं त्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं नाव असून या ओटीटीची निर्मिती नेमकी कशी झाली हे श्रेयसने 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
"मागील दोन वर्षांमध्ये सगळीकडेच प्रचंड मोठा बदल झाला आहे. लक्ष्मी असो वा अन्य अनेक चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले.मुळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं हाच त्यामागचा हेतू होता. त्यामुळे या दोन वर्षांमध्ये ओटीटीचा वापर खूप वाढला. आज प्रत्येक घराघरात ओटीटी वापरलं जातं. परंतु, थिएटर किंवा मराठी आर्ट सादर करणारे ओटीटी फारसे पाहण्यात आले नाहीत. त्यामुळेच आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी, नाटकांच्या प्रेक्षकांसाठीदेखील त्यांच्या हक्काचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु करावा असा विचार मनात होता", असं श्रेयस म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "या काळात अनेक मित्रांचे फोन आले आणि आपण थिएटरसाठी, कलाकारांसाठी काही तरी केलं पाहिजे यावर वारंवार चर्चा झाली. त्यानंतर मग आम्ही नाइन रसा सुरु करण्याचं ठरवलं".
काय आहे नेमकं नाइन रसा?
नाइन रसा या व्यासपीठावर प्रेक्षक पूर्ण लांबीची नाटके, लहान नाटके, नृत्य, कविता, कथा वाचन, माहितीपट अशा अनेक कलांचा आनंद घेऊ शकतात. या व्यासपीठावर उपलब्ध साहित्य हे हिंदी, मराठी, गुजराती, इंग्रजी या चार भाषांमध्ये आहे.