पन्नास वर्षे पायी वारी करणाऱ्या आई-वडिलांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा, प्रवीण तरडेंचं होतंय कौतुक
By देवेंद्र जाधव | Updated: July 24, 2025 10:55 IST2025-07-24T10:55:32+5:302025-07-24T10:55:58+5:30
प्रवीण तरडेंनी त्यांच्या आई-बाबांना पांडुरंगाचं दर्शन घडवून आणलं. याशिवाय त्यांच्या हस्ते महापूजाही केलेली दिसली

पन्नास वर्षे पायी वारी करणाऱ्या आई-वडिलांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा, प्रवीण तरडेंचं होतंय कौतुक
'मुळशी पॅटर्न', 'देऊळ बंद', 'धर्मवीर' असे एकापेक्षा एक सरस सिनेमे दिग्दर्शित करणारे अभिनेते - दिग्दर्शक म्हणजे प्रवीण तरडे. प्रवीण यांनी दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून मराठी इंडस्ट्रीत स्वतःची चांगली ओळख मिळवली. प्रवीण यांचं त्यांच्या आई-बाबांवर किती प्रेम आहे याची वारंवार उदाहरणं समोर येत असतात. अशीच एक खास कृती प्रवीण यांनी केलीय. वारी करणाऱ्या आई-बाबांच्या हस्ते प्रवीण तरडेंनी पांडुरंगाची पूजा केली आहे.
प्रवीण तरडेंनी सांगितला खास अनुभव
प्रवीण तरडेंनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत त्यांच्यासोबत आई-बाबा दिसत असून पंढरपूरातील विठूरायाचा गाभारा समोर दिसतोय. प्रवीण तरडे आणि त्याच्या आई-बाबांच्या गळ्यात तुळशीची माळ दिसत असून त्यांनी पांडुरंगाची पूजा केलेली दिसतेय. हा फोटो शेअर करुन प्रवीण तरडे कॅप्शनमध्ये लिहितात की, “ याची देही याची डोळा , जाहला सोहळा अनुपम्य..” गेली पन्नास वर्षे पायी चालत वारी करणाऱ्या माझ्या आई वडीलांनी आज पहाटे दिप अमावस्येच्या मुहूर्तावर पंढरपूरला पांडुरंगाची महापूजा केली.."
प्रवीण तरडेंनी सांगितल्यानुसार, त्याचे आई-बाबा दोघेही वारकरी आहेत. दोघेही गेली ५० वर्ष पायी वारी करत आहेत. प्रवीण तरडे आई-वडिलांच्या आनंदासाठी अशा खास कृती करताना दिसतात. प्रवीण तरडेंच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते सध्या 'देऊळ बंद २' या सिनेमाचं शूटिंग करत आहेत. या सिनेमात अभिनेता मंगेश देसाई प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचं समजतंय.