किचन कल्लाकार फेम ओ शेठ म्हणतोय, 'तुझी माझी जोडी जमली'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 18:28 IST2023-02-20T18:16:20+5:302023-02-20T18:28:27+5:30
प्रणवने याधी काही मालिकांबरोबरच मराठी सिनेमातही काम केले आहे.

किचन कल्लाकार फेम ओ शेठ म्हणतोय, 'तुझी माझी जोडी जमली'
छोट्या पडद्यावरील 'किचन कल्लाकार' या शोमध्ये ''ओ शेठ''... असा आवाज करताच अभिनेता प्रणव रावराणेची एंट्री व्हायची. तिची हटके एंट्री पाहून चाहतेही हसून हसून लोटपोट व्हायचे. त्याचा अंदाजही चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरला होता. प्रणवने याधी काही मालिकांबरोबरच मराठी सिनेमातही काम केले आहे. 'दुनियादारी' या सिनेमात प्रणवने सॉरीची भूमिका लक्षवेधी ठरली होती. या सिनेमामुळे तो खर्या अर्थाने प्रकाशझोतात आला.
अभिनेता म्हणून त्याने स्वतःला सिद्ध करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. तसेच हस्यसम्राट, फु बाई फु या शोमधून त्याने रसिकांना खळखळून हसवले आहे.पण स्टँडअप कॉमेडीयन म्हणून नाही तर अभिनेता म्हणून त्याला आपली एक ओळख निर्माण करायची होती. दुनियादारी हा सिनेमा त्याच्या करिअरसाठी खर्या अर्थाने टर्निंग पॉईंट ठरला.
लवकरच त्याचा तुझी माझी जोडी जमली हे नवंकोरं नाटक रंगभूमीवर आलं आहे. आनंद म्हसवेकर लिखित दिग्दर्शित या नाटकात प्रणव रावराणे, मुकेश जाधव, अमृता रावराणे, निखिला इनामदार अशी स्टारकास्ट आहे.
जिव्हाळा या संस्थेने नाटकाची निर्मिती केली आहे. तर शांभवी आर्टसने हे नाटक प्रकाशित केले आहे. नाटकाचं संगीत सुखदा भावे-दाबके यांनी, नेपथ्य अनिश विनय यांनी केलं आहे. विनय म्हसवेकर निर्मिती प्रमुख, गोट्या सावंत सूत्रधार आहेत. प्रणव रावराणे आणि मुकेश जाधव यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटात अभिनेता होण्याचा प्रवास, त्यांच्या काही अडचणी आणि मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमाकडे फिरवलेली पाठ, या प्रश्नांवर, प्रेक्षकांचे मनोरंजन करीत हसवता हसवता मार्मिक भाष्य या नाटकातून केले आहे. अमृता रावराणे, निखिला इनामदार यांनी त्यांना उत्तम साथ दिली आहे.
मराठी रंगभूमीवर आनंद म्हसवेकर हे महत्त्वाचं नाव आहे. यु टर्नसारखी अनेक आशयसंपन्न नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. म्हसवेकर यांच्या नाटकांच्या मांदियाळीत आता "तुझी माझी जोडी जमली" या नाटकाचीही भर पडत आहे. त्यामुळे नाट्यप्रेमींना कसदार नाट्यकृतीचा आस्वाद घेता येणार आहे.