अभिनेते किशोर नांदलस्करांनी जवळपास दीड वर्षे घेतला होता देवळात आसरा, मग असे मिळाले होते हक्काचे घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 16:02 IST2021-04-20T16:01:25+5:302021-04-20T16:02:03+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे.

अभिनेते किशोर नांदलस्करांनी जवळपास दीड वर्षे घेतला होता देवळात आसरा, मग असे मिळाले होते हक्काचे घर
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे. किशोर नांदलस्कर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. एकेकाळी किशोर नांदलस्कर यांनी जवळपास दीड वर्षे भोईवाडा-परळ येथील श्रीराम मंदिरात आसरा घेतला होता.
किशोर नांदलस्कर भोईवाडा-परळ येथे पूर्वी राहात होते. त्यांचे घर छोटे असल्यामुळे ते देवळात झोपायचे. जवळपास दीड वर्षे त्यांनी मंदिराचा आसरा घेतला होता.
सरकारी दरबारी फेऱ्या मारूनही नांदलस्कर यांना घर मिळत नव्हते. अखेर त्यांनी एका मंदिरात आसरा घेतला. दिवसा शूटिंग केल्यानंतर रात्री झोपायला भोईवाडा-परळ येथील श्रीराम मंदिरात जात होते. तब्बल दीड वर्षे त्यांनी असे केले आणि एकेदिवशी हे वृत्त एका मराठी वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मंजूर केली आणि अखेर त्यांना हक्काचे घर मिळाले होते.
किशोर नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले. ‘नाना करते प्यार’, ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले.
महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’, प्राण जाए पर शान न जाए या हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका देखील गाजल्या.