Video: वाह मामा वाह! अशोक सराफांची तबल्यावरची थाप ऐकून सारेच अवाक्, व्हिडीओ बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:42 IST2025-10-07T13:39:26+5:302025-10-07T13:42:02+5:30
अत्यंत दुर्मिळ असा क्षण बघायला मिळाला. अशोक सराफ यांनी उत्कृष्ट तबला वादन करुन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं

Video: वाह मामा वाह! अशोक सराफांची तबल्यावरची थाप ऐकून सारेच अवाक्, व्हिडीओ बघाच
मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे सुप्रसिद्ध अभिनेते म्हणजे अशोक सराफ.अशोक सराफ यांना आपण विविध सिनेमा, मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. अशोकमामांनी आजवर विविध भूमिका करुन कधी हसवलं तर कधी डोळ्यात पाणी आणलं. अशोकमामा एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत हे सर्वांना माहितच आहे. अशातच अशोकमामांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ते उत्कृष्ट तबलावादन करताना दिसत आहेत.
अशोकमामांनी दिली तबल्याची साथ
अशोक सराफ यांचा एका कार्यक्रम समारंभातील व्हिडीओ अभिनेते, निवेदक विघ्नेश जोशींनी शेअर केला आहे. या व्हिडीओत विघ्नेश जोशी सुरुवातीला पेटी वाजवताना दिसतात. नंतर अशोक सराफ रंगमंचावर मांडी घालून पेटीतून निघालेल्या स्वरांचा अंदाज घेतात. पुढे विघ्नेश यांच्या पेटीला अशोक सराफ तबल्याची साथ देतात. अशोकमामांनी उत्कृष्ट तबला वाजवून पेटीसोबत स्वरांची जुगलबंदी केली. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याने त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अशोकमामांचं हे नवं रुप पाहून सर्वांनी त्यांना दाद दिली.
'अफलातून जुगलबंदी', 'सुंदर, दुर्मिळ मैफल', 'दादा! मस्तच...एकच नंबर!!!', अशा कमेंट करुन नेटकऱ्यांनी अशोक सराफ आणि विघ्नेश जोशींचं कौतुक केलं आहे. ज्या प्रेक्षकांनी हा दुर्मिळ क्षण याची देही, याची डोळा पाहिला असेल त्यांना नक्कीच आनंद झाला असेल, यात शंका नाही. अशोक सराफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ते सध्या 'अशोक मा.मा.' या मालिकेत काम करत आहेत. याशिवाय त्यांची भूमिका असलेला 'अशी ही जमवाजमवी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.