VIDEO: घरोघरी प्रचार करत होते आदेश बांदेकर, इतक्यात समोर आले दिग्दर्शक केदार शिंदे, मग घडलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:43 IST2026-01-10T10:41:11+5:302026-01-10T10:43:09+5:30
निवडणुकीच्या रणधुमाळीत हा मैत्रीपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आदेश बांदेकर आणि केदार शिंदे यांच्यात काय घडलं?

VIDEO: घरोघरी प्रचार करत होते आदेश बांदेकर, इतक्यात समोर आले दिग्दर्शक केदार शिंदे, मग घडलं असं काही...
सध्या महापालिका निवडणुकांचं वारं महाराष्ट्रात सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे यांची युती ही चर्चेचा विषय ठरत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची कालच नाशिकमध्ये संयुक्त सभाही पार पडली. प्रचाराला अवघे काहीच दिवस बाकी असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षासाठी दिवसरात्र काम करत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात घरोघरी प्रचार करताना आदेश बांदेकरांचीकेदार शिंदेंसोबत भेट होत. मग पुढे काय घडतं?
आदेश बांदेकर-केदार शिंदेंची भेट
''वॉर्ड १२२ (हिरानंदानी गार्डन पवई ) येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,मनसे , राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार )अधिकृत उमेदवार, निलेश साळुंखे यांच्यासोबत घरोघरी प्रचार करताना ( निशाणी मशाल) लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांची भेट झाली'', असं कॅप्शन देऊन आदेश बांदेकर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते प्रचार करताना केदार शिंदेंच्या घराबाहेर येतात. केदार आणि आदेश यांची अचानक भेट झाल्याने दोघांनाही आनंद होतो.
पुढे केदार शिंदे बाहेर येऊन आदेश बांदेकर यांची गळाभेट घेतात. उमेदवाराचं पत्रक केदार यांच्या हाती देऊन आदेश फोटो काढतात. अशाप्रकारे निवडणुकीच्या रणधुमाळीत हा मैत्रीपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सर्वांनी हा व्हिडीओ पाहून त्यांची पसंती दर्शवली आहे. आदेश बांदेकर आणि केदार शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आदेश यांची पत्नी सुचित्रा यांनी केदार यांच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.