बॉलिवूड सुपरस्टार नाही तर त्रिशा ठोसरला आवडतो मराठमोळा अभिनेता, वाचा कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 10:28 IST2025-10-23T10:27:43+5:302025-10-23T10:28:11+5:30
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्रिशानं तिच्या आवडत्या अभिनेत्याचा खुलासा केला.

बॉलिवूड सुपरस्टार नाही तर त्रिशा ठोसरला आवडतो मराठमोळा अभिनेता, वाचा कोण आहे तो?
Treesha Thosar : बालकलाकार त्रिशा ठोसर सध्या तिच्या आगामी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी दिल्लीतील विधानभवनात पार पडलेल्या ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात त्रिशाने "सर्वोत्कृष्ट बालकलाकार" हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि इतर मान्यवरांच्या डोळ्यातही तिच्यासाठी कौतुक स्पष्टपणे दिसत होते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारी सर्वात कमी वयाची पुरस्कार विजेती म्हणून तिला ओळखलं जातंय. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्रिशानं राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील अनुभव आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या भेटीबद्दल सांगितलं. तसेच तिच्या आवडत्या अभिनेत्याचा ही खुलासा केला.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'लोकसत्ता ऑनलाईन'ला दिलेल्या एका मुलाखतीत त्रिशाला विचारण्यात आलं की, "राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात वेगवेगळ्या सेलिब्रिटींना भेटलीस का? याचे उत्तर देताना ती म्हणाली की, "हो मी सर्वांना भेटले आणि त्यांच्यासोबत फोटो सुद्धा काढले. राणी मुखर्जी मॅम, मोहनलाल सर, शाहरुख खान सर, विक्रांत मेसी सर या सगळ्यांना भेटले. विक्रांत सर हे माझ्या आईचे फेवरेट आहेत".
यावेळी जेव्हा त्रिशाला तुझा आवडता अभिनेता कोण असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने दिलेले उत्तर उपस्थित सर्वांचे मन जिंकणारे ठरलं. सामान्यतः लहान मुलांना आवडत्या कलाकाराबद्दल विचारल्यास ते पटकन सलमान खान किंवा शाहरुख खानसारख्या अभिनेत्यांची नावे घेतात. पण, त्रिशाने बॉलिवूडच्या या सुपरस्टार्सना डावलून थेट मराठमोळ्या अभिनेत्याचे नाव घेतले. त्रिशा म्हणाली, "मला रितेश देशमुख सर फार आवडतात".
त्रिशाचे हे उत्तर ऐकून उपस्थितांना खूप आनंद झाला. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी तिचे कौतुक करत लगेच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "यालाच म्हणतात मराठी बाणा!". वयाच्या इतक्या लहान टप्प्यावर मिळालेले यश आणि बॉलिवूडच्या ग्लॅमरपेक्षा मराठी कलाकारांप्रती असलेले तिचे प्रेम पाहून त्रिशा ठोसरचे सर्वत्र कौतुक होत आहे.
'नाळ २'मध्ये त्रिशाने चिमीची भूमिका साकारली होती. सिद्धार्थ जाधवच्या सिनेमातही ती झळकली आहे. 'मानवत मर्डर्स', 'पेट पुराण' या वेब सीरिजमध्येही त्रिशा झळकली आहे. तसेच महेश मांजरेकरांच्या आगामी पुन्हा शिवाजीराजे भोसले या मराठी सिनेमात त्रिशा महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास हा सिनेमा येत्या 31 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.