फोटोंचं टपाल तिकीट! सिद्धार्थ जाधवला भरत जाधव यांच्या हस्ते मिळालं खास गिफ्ट, म्हणाला- "हा क्षण माझ्या आयुष्यात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 12:07 IST2025-04-27T12:06:23+5:302025-04-27T12:07:18+5:30
फोटोंचं टपाल तिकीट अन्...; 'आता थांबायचं नाय'च्या निमित्ताने सिद्धार्थ जाधवला मिळालं खास गिफ्ट, म्हणाला- "हा क्षण माझ्या आयुष्यात..."

फोटोंचं टपाल तिकीट! सिद्धार्थ जाधवला भरत जाधव यांच्या हस्ते मिळालं खास गिफ्ट, म्हणाला- "हा क्षण माझ्या आयुष्यात..."
Siddharth Jadhav Post : मुंबई महानगरपालिकेमधल्या कर्तबगार कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा 'आता थांबायचं नाय' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे आणि आशुतोष गोवारीकरअशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने आपल्या आयुष्यात गोड प्रसंग चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
नुकतीच सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर आता थांबायचं नाय च्या रिलीजपूर्वी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. त्यामध्ये अभिनेत्याने लिहिलंय, "आता थांबायचं नाय! चित्रपटाच्या निमित्ताने आज माझ्या अवघ्या पंचवीस वर्षांच्या या कारकिर्दीत बहुमान मला मिळालाय. आणि तोही माझ्या हक्काच्या माणसांकडून! आपण ज्या काळातून आलो, त्या काळी पत्र, टपाल आणि त्या टपालावरचं ते खास "स्टॅंप तिकीट" याचं वेगळंच महत्त्व होतं. तेव्हा प्रत्येक टपाल तिकीट आपल्या मनावर खोलवर ठसा उमटवायचं. त्या छोट्याशा तिकीटावर आपल्या देशाचे थोर नेते, आदर्श व्यक्ती, आणि जगभरात लौकिक मिळवलेल्या महान गोष्टींना स्थान मिळायचं.ते तिकीट म्हणजे केवळ कागदाचा एक तुकडा नव्हता; ती होती एक सन्मानाची मोहर, एक प्रतिष्ठेचं प्रतीक, आणि एक अभिमानाची खूण."
पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "माझ्या फोटोचं हे टपाल तिकीट" मिळावं यासाठी पंकज @pannkajpanchariya भावा .. हा क्षण माझ्या आयुष्यात आणण्यासाठी तू केलेली मेहनत.... किरण खोजे, प्रवीण डाळींबकर, पंकज पंचारिया आणि आदरणीय भरत जाधव सर. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमच्या आशीर्वादाची मायेची ऊब अशीच आयुष्यभर माझ्या पाठीशी राहू द्या. तुमच्याच प्रेरणेनं, तुमच्याच भरवशावर आणि तुमच्याच सोबतीनं आता हा प्रवास करायचाय. आपल्या सर्वांसाठी एकच मंत्र आहे— "long drive group"आता थांबायचं नाय! पंकजला सहकार्य केल्याबद्दल@saurabhdeshmukh2489 sir मनापासून आभार..." अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने शेअऱ केली आहे. त्याच्या या पोस्टवर मराठी कलाकारांसह चाहत्यांना लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, झी स्टुडिओज् प्रस्तुत , झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले,अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव मारुतीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव चार वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. गुलराज सिंग यांचं धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी व धरम वालिया यांनी केली आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव प्रोड्यूसर आहेत.