अभिनेता गोविंदाची पुन्हा होणार राजकीय एन्ट्री?; CM एकनाथ शिंदेंसोबत भेटीची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 13:52 IST2024-03-22T13:50:54+5:302024-03-22T13:52:05+5:30
Lok sabha Election 2024: उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी यंदा निवडणूक लढण्यास नकार दिल्याची माहिती आहे. याठिकाणी ठाकरे गटाने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अमोल किर्तीकरांना उमेदवारीसाठी पुढे केले आहे. त्यात या मतदारसंघात आता एका अभिनेत्याची एन्ट्री होणार हा अशी उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

अभिनेता गोविंदाची पुन्हा होणार राजकीय एन्ट्री?; CM एकनाथ शिंदेंसोबत भेटीची चर्चा
मुंबई - Actor Govinda Political Entry ( Marathi News ) बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री करणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण काही दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदाने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. गोविंदा याने यापूर्वी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढली होती. त्यावेळी लोकांनी त्याला निवडूनही दिले होते. त्यानंतर आता गोविंदाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं तो पुन्हा राजकारणात एन्ट्री करणार का हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून सध्या महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती. याठिकाणी विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे शिवसेना शिंदे गटात आहेत. मात्र अमोल किर्तीकर निवडणुकीत समोर असल्याने गजानन किर्तीकरांनी ही जागा लढवण्यास नकार दिला. त्यामुळे आता या जागेवर उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. त्यात अभिनेता गोविंदा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर पुढील काळात ते शिवसेना-शिंदे गटातही प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने एबीपीनं दिली आहे.
याआधी गोविंदाने उत्तर मुंबईच्या जागेवर २००४ साली भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव करून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यामुळे गजानन किर्तीकरांच्या जागेवर गोविंदा यांना शिवसेनेकडून संधी दिली जाईल असंही बोलले जात आहे. या मतदारसंघात उत्तरेकडील लोकांची संख्या जास्त आहे. त्यात सिनेकलाकार म्हणून गोविंदा यांना इथं फायदा होऊ शकतो. त्यात महायुतीचे पाठबळ मिळालं तर गोविंदा यांना चांगली मते पडतील अशीही चर्चा महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे. सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मात्र लवकरच याबाबत स्पष्टता येईल.
गोविंदा ठरला होता जायंट किलर
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा गड मानला जातो. या मतदारसंघात बोरिवली, दहिसर, मागाठणे, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. याच मतदारसंघात २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून गोविंदाला उभं केले होते. त्यावेळी पाच वेळा खासदार राहिलेल्या राम नाईकांचा पराभव करून गोविंदा जायंट किलर ठरला होता. गोविंदाने राम नाईकांना ४८ हजार मतांनी हरवलं होते.