Kokan Flood : कोकण फक्त ट्रीप एन्जॉय करण्यापूरतं नाही, भरत जाधवचं भावूक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 17:09 IST2021-07-24T17:03:51+5:302021-07-24T17:09:28+5:30
Kokan Flood : भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये 'युथ फॉर डेमॉक्रसी', असे तरुणाईला आणि नेटीझन्सला कोकणाच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय.

Kokan Flood : कोकण फक्त ट्रीप एन्जॉय करण्यापूरतं नाही, भरत जाधवचं भावूक आवाहन
मुंबई - रायगड, रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळी महाड येथील दुर्घटनास्थळाला भेट देत नागरिकांना धीर दिला, अनेकांचं सांत्वन केलं. तसेच, येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असून त्यासाठी आराखडा आखण्यात येईल, असेही स्पष्ट केले. मात्र, सध्या संसार उद्धवस्त झालेल्या नागरिकांना मदतीची गरज आहे, त्यांना आज वस्तू आणि अन्नधान्याची गरज आहे. त्यामुळेच, मराठमोळा अभिनेता आणि कोकणचा पुत्र भरत जाधव पुढे सरसावला आहे.
भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये 'युथ फॉर डेमॉक्रसी', असे तरुणाईला आणि नेटीझन्सला कोकणाच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय. आपल्या कोकणाला देऊया मदतीचा हात, जास्त दिवस टिकतील असे सुके पदार्थ (सुका मेवा, फरसाण, वेफर्स, बिस्कीट, खजूर). कुटुंबातील महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर वस्त्रे, जीवनावश्यक वस्तू, अंथरून-पांघरुण देण्यासाठी भरत जाधवने मदतीची हाक दिली आहे.
भरतने आपल्या पोस्टमध्ये मदत कुठे आणि कशी कराल याचाही उल्लेख केला आहे. ही पोस्ट शेअर करत ‘आपलं कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही. या पूर संकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या,’ असेही भरतने म्हटले आहे. कोकण म्हटलं की हिरवा निसर्ग, समुद्रकिनारी, मच्छीवर ताव आणि श्रावण सरींचा मस्त एन्जॉय अशीच सर्वांची कल्पना असते. मात्र, आज संकटाच्या तडाख्यात सापडलेल्या या निसर्ग सौंदर्याला वाचविण्यासाठी मदतीचं आवाहन होत आहे. कोकणला मदत करण्यासाठी भरतने पुढाकार घेतला आहे, त्याच्या हाकेला साथ देण्याचंही त्याने म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिली भेट
मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावात ४० हून अधिक ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. या गावात अद्यापही बचावकार्य सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर तळीये गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट दिली. त्यावेळी, घडलेल्या दुर्घटना पाहता सरकारकडून पुनर्वसन आराखडा आणि जल मॅनेजमेंट करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निसर्ग कोपात आक्रीत घडलं, हे पाहिल्यानंतर, डोंगरदऱ्यातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार आराखडा तयार करेल. वेधशाळा अंदाज व्यक्त करते, पण त्याचं प्रमाण आणि परिणाम कुणालाही सांगता येत नाही. कालपासून सातारा, सांगली, कोल्हापूर भागात खूप तणाव होता. नद्यांचं पाणी शहरात शिरलं आहे, ते पाहता नद्यांच्या वाहत्या पाण्यासाठी वॉटर मॅनेजमेंटचाही आराखडा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल झाले आहेत.