"बाबासाहेबांची ही शाळा जवळजवळ बंद पडायला आली होती पण...", किरण मानेंंची खास पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 11:55 IST2025-04-14T11:54:56+5:302025-04-14T11:55:57+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण ज्या शाळेत झालं तिथे गेल्यावर किरण मानेंनी त्यांना आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (kiran mane)

"बाबासाहेबांची ही शाळा जवळजवळ बंद पडायला आली होती पण...", किरण मानेंंची खास पोस्ट चर्चेत
किरण माने (kiran mane) हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. किरण माने यांना आपण विविध नाटक, मालिका आणि सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. किरण माने सोशल मीडियावर विविध विषयांवर व्यक्त होताना दिसतात. किरण मानेंनी आंबेडकर जयंतीनिमित्त (dr babasaheb ambedkar jayanti) एक नवीन पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शाळेत पहिली ते चोथी शिक्षण घेतलं, तिथे गेल्यावर आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय.
किरण माने लिहितात की, "सातारा ! ज्या शाळेत भिमरायानं पहिलं पाऊल ठेवलं... पहिली ते चौथीपर्यन्त शिक्षण घेतलं... त्या शाळेत भिमजयंतीच्या पुर्वसंध्येला प्रमुख पाहुणा म्हणून मला निमंत्रित केलं होतं. यासारखं दुसरं सुख कुठलं असेल सांगा बरं…"
"रात्री छ. प्रतापसिंह हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचा जो आनंद घेतलाय, त्याला तोड नाही. फोटोत तुम्हाला स्टेजवर एक मुलगी बसलेली दिसतेय ना… ती जपानी आहे. बुद्धविचारांची अभ्यासक. ‘बुद्धाचा देश’ बघायला ती भारतात आलीय. इथला बुद्ध शोधता-शोधता तिला भीमराया सापडला. एवढा ज्ञानी महामानव ज्या शाळेत शिकला ती शाळा पहायच्या ओढीनं इथं आली."
"बाबासाहेबांची ही शाळा जवळजवळ बंद पडायला आली होती. फक्त २९ विद्यार्थी होते. मुख्याध्यापक सन्मती देशमाने सरांनी अक्षरशः जीवाचं रान करत मोजक्या शिक्षकांच्या साथीनं या वास्तूला पुन्हा जिवंत केलंय... आज दिडशे मुलं आहेत. असे एक सो एक हिरे घडवलेत की याच शाळेतनं पुन्हा नवीन भिमराय पुढे येतील आणि हा देश वाचवतील यात शंका नाही. छोट्या भिवानं शाळेत प्रवेश घेतलेल्या नोंदीचा अभिलेख मुख्याध्यापकांनी मला भेट दिला तो अजूनही पुनःपुन्हा पाहतोय. मन भरत नाही. जय शिवराय… जय भीम"