टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला लोळवलं, करीना कपूर म्हणाली "मुलींना मर्यादा न ठेवता स्वप्नं पाहू देणं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:43 IST2025-10-31T13:39:23+5:302025-10-31T13:43:22+5:30
ऑस्ट्रेलियाला हरवून भारत फायनलमध्ये; अभिनेत्री करीना कपूरकडून खास अभिनंदन

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला लोळवलं, करीना कपूर म्हणाली "मुलींना मर्यादा न ठेवता स्वप्नं पाहू देणं..."
Kareena Kapoor Praises Indian Womens Cricket Team: भारतीय महिला संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद १३४ चेंडूत १४ चौकारांसह १२७ धावांची नाबाद खेळी केली. आता फायनलमध्ये भारतीय संघाला विजेतेपदासाठी दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करायचे आहेत. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो. बॉलिवूडची 'बेबो' आणि अभिनेत्री करीना कपूर खान हिने टीम इंडिया आणि जेमिमा रॉड्रिग्जचे खास अभिनंदन केले आहे.
करीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जेमिमाच्या उत्कृष्ट फलंदाजीचे फोटो शेअर करत "किती अद्भुत खेळ, जेमिमा" असे लिहीत तिचे कौतुक केले. दुसऱ्या एका स्टोरीमध्ये, करीनाने भारतीय महिला संघासोबतचा फोटो शेअर करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, "आणि मी म्हटल्याप्रमाणे, मुली काहीही करू शकतात. धैर्य आणि दृढनिश्चयाने... शाब्बास टीम इंडिया... मुली अंतिम फेरीत आहेत".

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापुर्वी सामना सुरू होण्यापूर्वी करीना कपूर खानने युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय राजदूत (National Ambassador) म्हणून भारतीय महिला संघाची भेट घेतली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या भेटीचा व्हिडीओ शेअर केला होता.
तसेच करीनाने भारतीय महिला संघासोबतचा फोटो पोस्ट करत आपला अनुभव व्यक्त केला. "आज स्टेडियममध्ये असणं खूप खास होतं… ती ऊर्जा, तो जल्लोष, महिलांच्या क्रिकेटसाठीचं प्रेम! अशा क्षणांमुळेच मला पुन्हा जाणवतं की प्रत्येक मुलाला, विशेषतः मुलींना कोणत्याही मर्यादा न ठेवता स्वप्न पाहू देणं किती महत्त्वाचं आहे".
अभिनेत्रीने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात उपस्थित राहून 'Promise to Children' (मुलांना वचन) या मोहिमेद्वारे मुलांच्या हक्कांसाठी जागरूकता निर्माण केली. आता संपूर्ण देशाचे लक्ष महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे, जिथे भारतीय संघ विजेतेपदासाठी दक्षिण आफ्रिकेचा सामना करेल.
