ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:46 IST2025-09-12T13:30:12+5:302025-09-12T13:46:41+5:30
ज्वाला गुट्टा नुकतीच आई बनली आहे. २२ एप्रिल २०२१ रोजी तिने अभिनेता विष्णू विनोदसोबत लग्न केले होते.

ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि अभिनेता विष्णू विनोदची पत्नी ज्वाला गुट्टा (jwala gutta) हिने उचललेल्या एका कौतुकास्पद पाऊलामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. अलीकडेच आई बनलेली ज्वाला गुट्टा दररोज सरकारी रुग्णालयात तिचे ६०० मिलीमीटर दूध दान करत आहे. बॅडमिंटनच्या मैदानात देशासाठी कित्येक पदके जिंकणाऱ्या ज्वालाने आता चिमुकल्या जीवांना वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. ज्या नवजात बालकांना आई नाही, त्या बालकांच्या पोषणासाठी ज्वाला पुढे आली आहे. रिपोर्टनुसार आतापर्यंत ज्वालाने ३० लीटर ब्रेस्ट मिल्क दान केले आहे. मागील ४ महिन्यापासून ज्वाला गुट्टा आईचा आधार नसलेल्या बाळांसाठी आईची माया देत आहे.
ज्वाला गुट्टा नुकतीच आई बनली आहे. २२ एप्रिल २०२१ रोजी तिने अभिनेता विष्णू विनोदसोबत लग्न केले होते. त्यानंतर ४ वर्षांनी ती आई बनली. ज्वाला गुट्टा तिच्या बाळाला दूध पाजल्यानंतर तिचे अतिरिक्त दूध दान करत आहे. भारतात पहिल्यांदाच एखाद्या महिला खेळाडूने हे पाऊल उचलले आहे, जे खरोखरच प्रेरणादायी आहे. आईचे दूध लहान बाळांसाठी अमृतासारखे असते. आईच्या दूधात मुलाच्या वाढीसाठी सर्व आवश्यक पोषक तत्वे असतात. यामुळे मुलांमध्ये अॅलर्जी, दमा आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो.
ज्वाला गुट्टाने तिच्या करिअरमध्ये अनेकदा यश मिळवले. २०१० आणि २०१४ साली झालेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये तिने भारतासाठी गोल्ड मेडल जिंकले होते. वूमन्स डबलमध्ये तिने भारताला नवीन ओळख मिळवून दिली. ज्वाला गुट्टाने कायम खेळासोबत माणुसकीलाही प्राधान्य दिले. कोरोना काळात एका क्रिकेटपटूच्या आई वडिलांचा संघर्ष पाहून ज्वाला गुट्टा त्यांच्या मदतीसाठी सरसावली होती. ज्वालानं भारताची माजी क्रिकेटपटू सरावंती नायडू (Sravanthi Naidu) हिच्यासाठी तेलंगना सरकारकडे मदत मागितली होती. सरावंतीनं भारतासाठी चार वन डे व एक कसोटी सामना खेळल्या होत्या. हैदराबादची ऑलराऊंडर सरावंती नायडू हिच्या आई-वडिलांचा कोरोनाशी संघर्ष सुरू असून त्यांच्या उपचारासाठी मदतीची गरज आहे असं तिने ट्विट केले. ज्वाला फक्त ट्विट करून थांबली नाही, तर तिनं स्वतः आर्थिक मदतही केली होती.