जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 10:19 IST2025-06-18T10:18:42+5:302025-06-18T10:19:29+5:30
पाताल लोक या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अभिनेते जयदीप अहलावत यांनी दोन आठवड्यात आलिशान घरं खरेदी केली आहेत. जयदीप यांच्या नवीन घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
सध्या हिंदी ओटीटीविश्व आणि सिनेमांमध्ये चमकणारा सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे जयदीप अहलावत. जयदीप यांनी गेल्या काही वर्षांमध्ये विविध सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये काम केलंय. जयदीप हे सध्या करिअरच्या शिखरावर आहेत. जयदीप यांची व्यावसायिक दृष्ट्या प्रगती झाली आहेच पण आर्थिक दृष्ट्याही जयदीप मालामाल झाले आहेत, असं दिसतंय. कारण दोनच आठवड्यात जयदीप यांनी दोन घरं खरेदी केली आहेत. या दोन्ही घरांची किंमत कोटींच्या घरात आहे.
जयदीप यांनी अंधेरीला खरेदी केलं आणखी एक घर
काहीच दिवसांपूर्वी जयदीपने मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे एका पॉश भागात १० कोटी रुपयांचं घर खरेदी केलं होतं. याशिवाय मीडिया रिपोर्टनुसार जयदीपने अंधेरीमधील पूर्णा अपार्टमेंटमध्ये १० कोटींचं आणखी एक घर खरेदी केलं आहे. जयदीप यांच्या घराचा हा व्यवहार जून २०२५ मध्ये झाला होता. पहिलं घर खरेदी केल्यावर दोनच आठवड्यात जयदीपने हा घराचा व्यवहार केला आहे. जयदीपने पहिलं घर खरेदी केल्यावर त्याच बिल्डिंगमध्ये त्याच मजल्यावर या दुसऱ्या घराचा व्यवहार केला आहे. त्यामुळे जयदीपचे चाहते त्याचं अभिनंदन करुन त्याला शुभेच्छा देत आहेत. अशाप्रकारे दोन आठवड्यात जयदीपने तब्बल २० कोटींचा आर्थिक व्यवहार केला आहे.
जयदीपने जे नवीन घर खरेदी केलंय त्याचा एरिया १९५० स्केअर फूट इतकं आहे. याशिवाय या अपार्टमेंटमध्ये चार गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध आहे. जयदीपने ६० लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी भरली तर ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फी भरली. जयदीपने ज्या सोसायटीमध्ये घर घेतलंय ती सोसायटी अंधेरी वेस्ट येथील जुहूच्या समुद्रकिनारी स्थित आहे. या सोसायटीपासून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ३ किमी दूर आहे. याशिवाय लिंक रोड, वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो लाईनचं कनेक्शन आहे. अशाप्रकारे दोन आठवड्यात दोन घरं खरेदी केल्याने जयदीप खऱ्या अर्थाने मालामाल झालाय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.