'हाऊसफुल ५'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का? हसून हसून लोटपोट व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:51 IST2025-05-27T15:49:51+5:302025-05-27T15:51:35+5:30
'हाऊसफुल ५'च्या ट्रेलरमध्ये कॉमेडी, सस्पेन्ससह, मर्डरचा थरार आहे

'हाऊसफुल ५'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का? हसून हसून लोटपोट व्हाल!
Housefull 5 Official Trailer: सध्या एकाच चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे तो म्हणजे 'हाऊसफुल ५'. घोषणा झाल्यापासून सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. या चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर आधीच धुमाकूळ घातला असून अखेर आता धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. ज्यामध्ये कॉमेडी आहे, सस्पेन्स आहे आणि हो, मर्डर मिस्ट्रीसुद्धा. चित्रपटाची संपूर्ण स्टोरी एका क्रूझ म्हणजेच जहाजावर पाहायला मिळत आहे.
३ मिनिट ५३ सेकंदांच्या ट्रेलरमध्ये दिसतं की, ६९ बिलियन पाउंड्सचे मालक असलेले रंजीत दोबरिया हे एका भल्या मोठ्या शिपवर शंभराव्या वाढदिवसाची पार्टी देतात. याच पार्टीत ते आपला खरा वारसदार म्हणजे त्यांचा मुलगा 'जॉली' असल्याचं जाहीर करतात. पण, येथूनच गोंधळ सुरू होतो. कारण रितेश देशमुख, अभिषेक बच्चन आणि अक्षय कुमार हे तिघे आपणच 'जॉली' असल्याचा दावा करतात आणि मग एक मर्डर होतो. त्यामुळे तो खून कोण करतं? आणि ७९७ कोटींंची संपत्तींचा वारसदार कोण? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायचं असेल तर पूर्ण सिनेमाच बघावा लागेल.
तरुण मनसुखानी दिग्दर्शित या सिनेमात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, नाना पाटेकर, जैकी श्रॉफ, जॅकलिन फर्नांडिस, चंकी पांडे, शर्यस तळपदे, डिनो मोरिया, नर्गिस फाखरी, चित्रांगदा सिंग, सोनम बाजवा, साउंडर्या शर्मा आणि जॉनी लिव्हर अशी तगडी स्टारकास्ट आहे. संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ हे पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट येत्या ६ जून रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे बजेट ३७५ कोटी रुपये आहे. त्यामुळे आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
'हाऊसफुल' ही फ्रॅचायझी नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आली आहे. 'हाऊसफुल' हा चित्रपट २०१० मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट हिट झाल्यानंतर २०१२ मध्ये 'हाऊसफुल २' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात अक्षय, रितेश, जॉन अब्राहम, श्रेयस तळपदे, जॅकलीन फर्नांडिस, ऋषी कपूर, रणधीर कपूर, मिथुन चक्रवर्ती यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर हाऊसफुल ३ आणि हाऊसफुल ४ हे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले. या सर्वच सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. आता 'हाऊसफुल्ल ५' या सिनेमाची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. 'हाऊसफुल ५' प्रदर्शित झाल्यानंतर ही पहिलीच भारतीय फ्रॅचायझी असेल ज्याचे ५ भाग प्रदर्शित झालेत.